उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘100 दिवसात प्लॅस्टिक दूर.. नक्की करणार आमचं कोल्हापूर’ अभियानाचा शुभारंभ
कोल्हापूर: पर्यावरणाचे रक्षण आणि नागरिकांचे आरोग्य जपण्यासाठी सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे थांबवा, तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या टाळा, असे महत्त्वपूर्ण निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘100 दिवसांत प्लॅस्टिक दूर.. नक्की करणार आमचं कोल्हापूर’ या अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात आयोजित या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कापडी पिशव्यांचे अनावरण आणि माहिती परिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या अभियानांतर्गत 25 ऑगस्ट ते 3 डिसेंबर 2025 या कालावधीत ‘100 दिवस प्लॅस्टिक बंदी अभियान’ राबविण्यात येणार आहे.

नागरिकांच्या आरोग्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा अभिनव पुढाकार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अभियानात विविध पक्ष, संस्था, संघटना आणि स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून, सूक्ष्म नियोजन आणि विविध विभागांच्या समन्वयातून हे अभियान यशस्वी करण्याची सूचना त्यांनी केली.
‘प्लॅस्टिकमुळे आरोग्यासह अनेक समस्या’
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्लॅस्टिकच्या वाढत्या वापरामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांवर प्रकाश टाकला. भूमीगत वाहिन्या, गटारे तुंबणे, नद्यांचे प्रदूषण, आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रूपीकरण यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या आरोग्यासाठी प्लॅस्टिकचा वापर थांबवणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच प्लॅस्टिक बाटल्यांऐवजी स्टीलच्या बाटल्या वापरण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली.
या अभियानांतर्गत ‘100 दिवसात प्लॅस्टिक दूर.. नक्की करणार आमचं कोल्हापूर’ ही टॅगलाईन डिजिटल बोर्ड आणि होर्डिंग्जवर प्रसारित करण्यात येणार आहे. चहाचे कप, प्लेट, चमचे, पाण्याच्या बाटल्या, पिशव्या अशा सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर टाळण्यावर भर देण्यात येणार आहे. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कागदी व कापडी पिशव्या आणि स्टीलच्या बाटल्यांचा वापर वाढवण्यावर भर दिला जाईल.
या अभियानात शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, व्यावसायिक, फेरीवाले, बचतगट, अंगणवाडी यांसारख्या विविध घटकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. याशिवाय, प्लॅस्टिक विरोधी घोषवाक्य, पथनाट्य, रिल्स आणि पोस्टर्स स्पर्धांचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.