- अभियानांतर्गत 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान शिलाफलक, पंच प्रण शपथ, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन यासह विविध उपक्रम
- ग्रामपंचायत, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन
- आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम निर्माण होण्यासाठी गाव ते शहरांमध्ये कार्यक्रम
- स्वातंत्र्य सैनिक वीरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘वीरांना वंदन’
- सुक्ष्म नियोजन करुन कल्पकतेने अभियान साजरे करा
कोल्हापूर : आझादी का अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत राज्यासह देशभरात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबवण्यात येणार आहे. दिनांक 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत शिलाफलक, पंच प्रण शपथ, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन या कार्यक्रमांसह तिरंगा फडकविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घेत लोकसहभागातून हे अभियान यशस्वीपणे राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या.
आझादी का अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान राबवण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, गृह विभागाच्या पोलीस उप अधीक्षक प्रिया पाटील, तहसीलदार सुर्यकांत पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी, ग्राम विकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले.
जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले होते. अमृत महोत्सवाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ (मिट्टी को नमन विरों को वंदन) अभियान 9 ते 14 ऑगस्ट 2023 दरम्यान राबवण्यात येणार आहे. या काळात ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपरिषद याठिकाणी गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे, असे सांगून ते म्हणाले,
या अभियानांतर्गत गावातील संस्मरणीय ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करा. या शिलाफलकावर ग्रामपंचायत क्षेत्रात देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या थोर व्यक्तींची नावे द्यावीत. लोकप्रतिनिधी तसेच ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी व गावकरी यांनी दिवे घेवून पंच प्रण शपथ घ्यावी. याबरोबरच गावातील योग्य ठिकाण निवडून ‘वसुधा वंदन’ म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करुन अमृत वाटिका तयार करावी.
देशासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी व देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या व वीरांच्या कुटुंबातील सदस्यांना सन्मानित करा, असेही त्यांनी सांगितले. अभियानांतर्गत गावात योग्य ठिकाणी कार्यक्रम घेवून तिरंगा फडकवण्यात येणार असून यासाठी चोख नियोजन करा. हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी तालुकास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करा. देशभक्तीपर अन्य विविध कार्यक्रम आयोजित करुन या अभियानात लोकप्रतिनिधी व अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्या, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आले आहेत. ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या अभियानांतर्गत सर्व कार्यक्रम योग्य नियोजनातून मोठ्या प्रमाणात साजरे करा. इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह सर्वांनी अभियानासाठी योग्य नियोजन करत असल्याबाबत माहिती दिली.