मंदिराची चौकट बसविण्याचा कार्यक्रम उत्साहात
कागल, दि.२०: कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकात हनुमानाचे पुरातन काळातील मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम करताना अनंत अडचणी आल्या, त्यावर मातही केली. प्रभू श्री. राममंदिरापाठोपाठ रामभक्त हनुमानाचे हे मंदिर पूर्णत्वाला जात असल्याचा समाधान मोठे आहे, अशी भावना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
दोन कोटी रुपये खर्चून बांधकाम सुरू असलेल्या या मंदिराची चौकट बसविण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री. मुश्रीफ बोलत होते.
भाषणात आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, हनुमान हे दैवत शक्तीचे प्रतीक आहे. निष्ठा कशी असावी, हे हनुमानाकडून शिकावे. सत्ता असली तरी आणि नसली तरी मला काहीही फरक पडत नाही. विकास कामांसाठी निधीचा ओघ हा अखंडपणे सुरूच राहील, असेही ते म्हणाले.
माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी प्रभू श्री. रामांचे मंदिर मोठ्या ताकदीने पूर्ण केले आहे. त्यांची इच्छाशक्ती, पाठपुरावा आणि पाठिंब्यामुळेच राम भक्त श्री. हनुमानाचे हे मंदिर पूर्णत्वाला आले.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी ७०० हून अधिक मंदिरांची बांधकामे पूर्णत्वाला नेली आहेत. राजकारण म्हणून ते कधीच मंदिराचे बांधकाम करत नाहीत. मंदिरामध्ये मनशांती मिळते, माणूस समाधानी राहतो. या भावनेतूनच त्यांनी मंदिरांच्या बांधकामाना हातभार लावला आहे.
नगरसेवक प्रवीण काळबर म्हणाले, हे मंदिर बांधताना अनेक अडचणी आल्या. आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी पाठबळ दिल्यामुळेच हे मंदिर पूर्णत्वाला आले. विकास कामांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच अग्रेसर राहील, असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष श्रीमती आशाकाकी माने, जेष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, पी. बी. घाटगे, नवल बोते, प्रमोद पाटील, संजय गोनुगडे, अजितराव कांबळे, सौरभ पाटील, ॲड. संग्राम गुरव, संजय चितारी, दत्ता पाटील, विवेक लोटे, संदीप भुरले, सौरभ पाटील, बाबासाहेब नाईक, नवाज मुश्रीफ, बच्चन कांबळे, अस्लम मुजावर, अमर सनगर, गंगाराम शेवडे, सनी जकाते, सौ. दिपाली भुरले, सौ. वर्षा बने, सौ. माधवी मोरबाळे आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत माजी नगराध्यक्ष अशोकराव जकाते यांनी केले. प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक शामराव पाटील यांनी केले. सूत्रसंचालन निशांत जाधव यांनी केले.