बॉयलर अग्नीप्रदीपन व इथेनॉल हंगामाचा शुभारंभ उत्साहात
१९ ऑक्टोबरला होणार गळीत हंगाम शुभारंभ
सेनापती कापशी, दि. १५ : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चालू गळीत हंगामात नऊ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी दिली. कारखान्याच्या सातव्या गळीताच्या बॉयलर अग्नीप्रदीपन व इथेनॉल निर्मिती हंगामाच्या शुभारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते मंगळवारी दि. १९ कारखान्याच्या सातव्या हंगामाचा गळीत शुभारंभ होणार आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बॉयलरचे अग्नीप्रदीपन व इथेनॉल निर्मिती हंगामाचा शुभारंभ अध्यक्ष श्री. नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, नऊ लाख टन ऊस गाळपासह या हंगामात सहवीज प्रकल्पातून ११ कोटी युनिट वीजनिर्मिती करण्याचा संकल्प आहे. इथेनॉल प्रकल्पामध्ये इथेनॉल व रेक्टिफाईड स्पिरिट, असे एकूण एक कोटी ४० लाख लिटर्स निर्मितीचा संकल्प आहे.
ते पुढे म्हणाले, सामाजिक बांधिलकीतून कारखान्याने ऑक्सीजन प्रकल्प उभारणी केली असून तो चांगल्या पद्धतीने कार्यान्वित आहे. आमचे नेते, कारखान्याचे संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांनी कारखान्याची विस्तारवाढ गाळप क्षमता दहा हजार मेट्रिक टन, ५० मेगावॅट सहवीज प्रकल्प व दररोज एक लाख लिटर इथेनॉल निर्मिती याप्रमाणे करण्याचा मनोदय यापूर्वीच व्यक्त केला आहे. त्याप्रमाणे व्यवस्थापन आर्थिक नियोजन करीत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी, तोडणी -वाहतुकीची बिले, सभासद साखर वेळेवर देण्याची परंपरा ठेवली असून शेतकऱ्यांच्यासाठी अनेक सवलतीच्या योजनाही कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना जादा ऊस उत्पादनाबाबत सातत्याने मार्गदर्शन व ऊस विकासाच्या विविध योजनाही राबविल्या जात आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला सर्वच्या -सर्व उस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
“एकरकमी एफआरपी व वेजबोर्डचीही गोड बातमी……..”
अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, या हंगामाची एकरकमी एफआरपी देणारच आहोत. तसेच कामगारांच्या वेजबोर्डची गोड बातमीही संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ या हंगामाच्या गळीत शुभारंभात जाहीर करतील.
स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी कारखान्याच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.