मुरगूड ( शशी दरेकर ) – राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजाला समतेचा विचार देऊन समाज जागृती केली. त्यांनी आपल्या कार्यकाळात समाज सुधारणा करीत असताना शैक्षणिक, कृषी सिंचन, सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात भरीव योगदान दिले. ” स्त्री- पुरुष समानता, दलितोद्धार यासाठी ते आग्रही राहिले.” असे मत पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडाचे प्राचार्य डॉ. टी. एम.पाटील यांनी व्यक्त केले. ते गगनबावडा महाविद्यालय व तहसीलदार कार्यालय, गगनबावडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शाहू विचारांचा जागर या विशेष व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुक्याचे तहसीलदार मा. बी. जे. गोरे उपस्थित होते. त्यांनी शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक होऊन सर्वांनी उन्नती साधली पाहिजे असा संदेश देत शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित निवासी नायब तहसीलदार सूर्यकांत कापडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई, तहसीलदार कार्यालयाचे भांडवलकर आणि पाटुकले उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस एस पानारी यांनी, आभार एन.एस.एस कार्यक्रमाधिकारी प्रा. आदिनाथ कांबळे यांनी केले. तर, सूत्रसंचालन प्रा.ए.आर. गावकर यांनी केले. याप्रसंगी प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.