कागल (सलीम शेख ): कागल पोलिसांनी बेकायदेशीर गोमांस वाहतुकीवर मोठी कारवाई करत हॉटेल अशोक समोरील बोदग्यातून विनापरवाना गोमांस घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे दोन हजार किलो गोमांसासह एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, हॉटेल अशोकसमोरून बेकायदेशीर गोमांसाची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि आज सकाळी विनापरवाना गोमांस घेऊन जाणारा एक टेम्पो पकडला. पोलिसांनी टेम्पो चालक आतिक मदार बेपारी (रा. लाठवडे रोड) याला रंगेहात पकडले. त्याच्याकडे गोमांस वाहतुकीसाठी कोणताही परवाना नव्हता.


या कारवाईत पोलिसांनी अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे, सुमारे दोन हजार किलो गोमांस जप्त केले. तसेच, गोमांस वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पोसह एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी ताब्यात घेतलेले गोमांस जेसीबीच्या सहाय्याने खड्ड्यात टाकून त्याची विल्हेवाट लावली.
पोलिसांनी चालक आतिक बेपारी याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कागल पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस रमेश तावरे, युवराज पाटील आणि सुनील कांबळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास पोलीस रमेश तावरे करत आहेत. बेकायदेशीर गोमांस वाहतुकीवर झालेली ही कारवाई कागलमधील सर्वात मोठी आणि अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.