वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा
कोल्हापूर : कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथील नागरिकांच्या मागणीनुसार गावातील गायरान जागेवर घरकुले बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून गावठाण विस्तार योजनेतून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. गावातील नागरिकांना घरकुले बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने तालुका प्रशासनाकडे अनेक घरकुलांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे गावाचा विस्तार करण्याच्या अनुषंगाने गायरान जागेतून गरजूंना घरकुलांसाठी जागा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना श्री. मुश्रीफ यांनी दिल्या. यासंदर्भात त्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांवर आढावा बैठक घेतली.
या बैठकीस जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी (मुद्रांक) बाबासाहेब वाघमोडे, जिल्हा अधीक्षक (भूमी अभिलेख) शिवाजीराव भोसले, प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमर वाकडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

बैठकीत कागल शहराजवळील राष्ट्रीय महामार्ग हद्दीतील सेवा रस्त्यावरील खड्डे आणि सांडपाणी नलिकेच्या प्रलंबित कामांबाबत चर्चा झाली. यासंदर्भात संबंधित विभागाला दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या. राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंत्यांनी एप्रिल 2026 पर्यंत सर्व कामे पूर्ण होणार असून, खड्डे तातडीने बुजवण्याची कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
तसेच, सिद्धनेर्ली येथील घरांच्या नोंदींसंदर्भात तेथील हौसिंग सोसायटी कार्यान्वित करून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. म्हाकवे गावातील गायरान जागेतील प्लॉट्सच्या लिलावाबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या. शिवाय, कागल शहरातील सिटी सर्व्हे 1935 मधील नागरिकांच्या दस्तनोंदणीबाबत मुद्रांक जिल्हाधिकारी (कोल्हापूर) आणि उपअधीक्षक (भूमी अभिलेख, कागल) यांना सूचना देण्यात आल्या.