कसबा सांगाव येथे विविध उपक्रमांचे आयोजन
कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत पंचायत समिती कागलच्या वतीने गुरुवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२६ रोजी मौजे कसबा सांगाव (ता. कागल) येथे विविध लोककल्याणकारी उपक्रमांनी अभियानाचा यशस्वी शुभारंभ करण्यात आला.
या अभियानाची औपचारिक सुरुवात पंचायत समितीच्या मा. सभापती सौ. सुवर्णा पाटील आणि मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जोशी सर यांच्या शुभहस्ते करण्यात आली. या प्रसंगी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. कुलदिप बोंगे, पं.स. सदस्या सौ. तेजस्विनी भोरे, श्री. अनिलकुमार हेगडे, कसबा सांगावचे सरपंच, तालुका आरोग्य अधिकारी तसेच इतर मान्यवर प्रमुख उपस्थित होते.


अभियानांतर्गत आयोजित प्रमुख उपक्रम:
- प्रा.आ.केंद्र कसबा सांगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर: प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्तदाब, शुगर, ईसीजी (ECG) आणि कॅन्सरविषयक समुपदेशन यांसारख्या विविध तपासण्या करण्यात आल्या. परिसरातील नागरिकांनी या शिबीराचा उत्स्फूर्तपणे लाभ घेतला.
- वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम:मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी व पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शासकीय कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले.

शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थितांना सेवा संकल्प अभियानाचा मूळ उद्देश स्पष्ट केला. या अभियानाच्या माध्यमातून सर्व शासकीय योजनांचा लाभ समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.

गटविकास अधिकारी श्री. कुलदिप बोंगे यांनी सांगताना स्पष्ट केले की, १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या महिनाभराच्या कालावधीत संपूर्ण कागल तालुक्यामध्ये विविध शासकीय योजना, आरोग्य सेवा व सुविधा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबवले जाणार आहेत.