मुरगूड ( शशी दरेकर ) : पद्मश्री डॉ. गो. गो. जाधव महाविद्यालय, गगनबावडा येथे आंतरराष्ट्रीय वाणिज्य दिनाच्या निमित्ताने गगनबावड्यातील यशस्वी व्यवसायिकांचा सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देवून महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गगनबावड्यातील विविध क्षेत्रातील एकुण २२ उद्योजक उपस्थित होते.
यावेळी यशस्वी उद्योजकांनी मनोगते व्यक्त केली. मधनिर्मिती उद्योजक श्री. ज्ञानदेव पाटील यांनी मधुमक्षिका पालन, राजेंद्र पाटील यांनी सेवया, मेणबत्ती, राजिगरा लाडु आशा विविध खाद्यपदार्थ निर्मिती, राजेंद्र कांबळे यांनी काॅम्प्युटर आणि तंत्रज्ञानाचा व्यवसायासाठी उपयोग आणि धनश्री भस्मे कापड उद्योगाबाबत माहिती दिली.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एस. पानारी यांनी त्यांच्या व्याख्यानात वस्तू विनिमयापासुन व्यवसायाच्या डिजिटल प्रवासावर प्रकाशझोत टाकला. याकार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. टी. एम. पाटील बोलताना गगनबावडा तालुक्याच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासासाठी हस्त उद्योग, लघुउद्योग, कुटीर आणि औषधी उद्योगांचा विकास झाला पाहिजे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमामध्ये गगनबावडा तालुका चेंबर ऑफ कॉमर्स, आयुर्वेदिक औषध निर्मिती केंद्र, गारमेंट उद्योग अशा संस्था आणि उद्योगांची उभारणी करण्याबाबतचा सुर दिसून आला.
यावेळी विशाल पडवळ, अरुण चव्हाण, सलीम जमादार, बाळकृष्ण गावकर, गुरुनाथ कांबळे, साधना माळी, जावेद आत्तार, सर्जेराव माळी, राजेश शिंदे, बापु जाधव, राजेंद्र कांबळे, स्मिता शिंदे, विनोद प्रभुलकर, अमोल सावंत, निता पडवळ, रविराज खोत, रोहिणी कांबळे, पुजा नागप, सागर वरेकर इत्यादी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतिश देसाई, सचिव डॉ. विद्या देसाई यांचे प्रोत्साहन लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन वाणिज्य विभागप्रमुख प्रा. आदिनाथ कांबळे यांनी केले. आभार प्रा. शितल मोहिते तर, प्रा. एच. एस. फरास यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.