कागल (विक्रांत कोरे) : करनूर ता. कागल येथे आजी- माजी जवानांचा सत्कार आजी-माजी संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी माजी सैनिक सखाराम नलवडे होते. यावेळी कै. डी. बी. पाटील विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार व नेशन बिल्डर पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ गार्गीज यांचा गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल करनूर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. शाकेरा हारुन मुजावर व करनूर मधील पहिली महिला आसाम रायफल मधून सैन्यदलामध्ये दाखल झाल्याबद्दल महिला जवान कु. अक्षता बळीराम घाटगे यांचा नागरी सत्कार मरीआई मंदिर येथे करण्यात आला.1971मध्ये भारत- पाकिस्तान युद्धात अमर झालेले अमर जवान संभाजी सुबराव नलवडे यांच्या स्मृतीस अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मुख्याध्यापिका सौ. मुजावर म्हणाल्या, मुलींनी प्रत्येक क्षेत्रात चमकले पाहिजे. अक्षताचा आदर्श मुलींनी घेऊन अनेक क्षेत्रात पुढे आले पाहिजे. माझ्या शाळेच्या माध्यमातून अनेक चांगले विद्यार्थी घडत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. यावेळी महिला जवान अक्षता घाटगे, मा. सरपंच सचिन घोरपडे, पुष्पा बनके यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत विठ्ठल कांबळे तर सूत्रसंचालन सचिन घोरपडे यांनी केले. यावेळी माजी सैनिक पांडुरंग खराडे, के. डी. पाटील, गजानन निकम, विशाल नलवडे, रोहित घाटगे, सौ. सुनीता घाटगे, बळीराम घाटगे, रामचंद्र पाटील, बाळासो पाटील, तानाजी भोसले, सतिष धनगर आदी. अपंग सेलचे कार्यकर्ते , करनूर विद्यालयाचे सर्व शिक्षक, नागरिक, आजी-माजी सैनिक उपस्थित होते, आभार माजी सैनिक पांडुरंग खराडे यांनी मानले.