सव्वा लाखाचे पहिले बक्षीस, इतर अनेक बक्षिसांची रेलचेल
मुरगूड ( शशी दरेकर ): सानिका स्पोर्ट्स या प्रथितयश स्वंयसेवी क्रीडा संस्थेमार्फत दरवर्षी नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात येतात.
किंबहुना क्रीडाक्षेत्रात मुरगूड शहराची ती एक वेगळी ओळख म्हणता येईल.त्याचे कारण विस्तीर्ण क्रीडांगण,विद्युत पुरवठा, प्रेक्षक गॅलरी यांची हवी तशी कसलीही सुविधा नसताना एवढे भव्य सामने भरवले जातात हेच विशेष आहे.
मराठी शाळेचे क्रीडांगण,भाड्याने आणलेली प्रेक्षक गॅलरी, ओढून ताणून केलेला वीजपुरवठा आणि विनामूल्य सामने तेही अगदी आंतर विद्यापीठ दर्जाचे .
बक्षिसे देखील थोडी थोडकी नाहीत.चषकासह जवळजवळ सव्वा लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस.द्वितीय क्रमांक ६१ हजार व चषक,तृतीय क्रमांक २१हजार व चषक. याशिवाय मॅन ऑफ द सीरिज ला इलेक्ट्रिक बाईक .ही व अशा अनेक बक्षिसांची रेलचेल पहायला मिळते.
देणगीदार आणि सर्व संघांकडून मिळणारी प्रवेश फी हेच उत्पन्न, क्रीडा शौकिनांची कमतरता नाही. कोल्हापूर करांचे फुटबॉल प्रेम आणि मुरगूड करांचे क्रिकेट प्रेम साऱ्या जिल्ह्याला माहिती आहे, दोन कॅबिनेट मंत्री लाभलेल्या या जिल्ह्याला आता क्रीडा विकासाचे वरदान हवे आहे, खाशाबा, कुसाळे, नाडकर्णी, युवराज जिथे तयार झाले तेथे विराट आणि रोहित सुध्दा तयार होतील.