कोल्हापूर दि. 6 : जेनेरीक औषधांच्या जनजागृतीसाठी 7 मार्च हा दिवस “जन औषधी दिवस” म्हणून साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्रात जन औषधी दिवस विषयावर व्यापक जनजागृतीसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रक्तदाब, मधुमेह आजाराची तपासणी होऊन औषधे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
उच्च रक्तदाब आणि मधुमेह रुग्णांसाठी वैद्यकीय अधिकारी व समुदाय आरोग्य अधिकारी या तज्ज्ञांद्वारे उपचार होणार असुन प्रत्येक रुग्णांसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.
आयुष्यमान भारत आरोग्यवर्धीनी केंद्रामार्फत आशा आणि आरोग्य सेविकांकडून उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या सर्व रुग्णांची माहिती अदयावत ठेवून उपचाराचे सनियंत्रण करण्यात येणार आहे. गरीब, गरजु रुग्णांना औषधांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे आणि नियमितपणे औषधे घेत असल्याबाबत खात्री करण्यात येणार आहे. तरी जनतेने जनऔषधी वितरण उपचारांचे पालन आणि फायदे समजून घेवून योजनेचा लाभ घ्यावा.
वाढता ताण तणाव व त्यामुळे होणारे मधुमेह व रक्तदाब यासारखे आजार भविष्यात हृदयरोग व पॅरालिसीसमुळे आयुष्य संपवून टाकतात. या आजारावरील औषधे सर्वसामान्य लोकांना परवडत नाहीत. त्यामुळे शासनाच्यावतीने “जन औषधे केंद्र ” याद्वारे गरीबांना अल्प दरात औषधे उपलब्ध झाल्याने त्यांना संजीवनी मिळत आहे. ही औषधे जन औषधी केंद्रात उपलब्ध असून किंमतीने कमी आहेत. त्यामुळे ती सर्वसामान्य लोकांना परवडतात. त्यांची गुणवत्ताही चांगली आहे.