कोल्हापूर: जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज कोल्हापूरमध्ये ‘नॅनो खते जागरूकता अभियाना’चा शुभारंभ केला, यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना स्वदेशी नॅनो खतांचा वापर करून विषमुक्त शेती साधण्याचे आणि ‘आत्मनिर्भर भारत – आत्मनिर्भर कृषी’ संकल्पना साकारण्याचे आवाहन केले. कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि इफको यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि इफकोचे वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. एम.एस. पोवार यांनी नॅनो खतांचे अनेक फायदे अधोरेखित केले.

नॅनो खतांमुळे पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढते, रासायनिक खतांचा वापर कमी होतो, प्रदूषण घटते आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. विशेषतः, नॅनो युरिया प्लस, नॅनो डीएपी (दाणेदार), नॅनो झिंक आणि नॅनो कॉपर हे पारंपरिक खतांना प्रभावी पर्याय असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ही खते वाहतूक आणि साठवणुकीत सोपी असून पूर्णतः सुरक्षित व हानीविरहित आहेत. पंतप्रधान प्रणाम योजनेसाठीही ती अनुकूल असल्याचे डॉ. पोवार यांनी नमूद केले.

या अभियानाअंतर्गत नॅनो खत खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘संकटहरण विमा योजने’ अंतर्गत 2 लाखांपर्यंतचा निःशुल्क दुर्घटना विमा मिळणार आहे. इफकोने नॅनो खतांच्या वापराबद्दलची यशोगाथा, संशोधन अहवाल आणि चाचणी निष्कर्ष आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. शेतकऱ्यांनी या खतांचा योग्य वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच, नॅनो खतांची विक्री करताना तांत्रिक माहिती द्यावी आणि इतर कृषी उत्पादनांसोबत दबाव टाकून विक्री करू नये. अशा प्रकारची कोणतीही तक्रार असल्यास 1800 103 1967 या टोल फ्री क्रमांकावर किंवा संबंधित इफको अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.