मुरगूड नगरपालिकेची मालमत्ता कराची ७५.६९ टक्के तर पाणीपट्टीची ७५ टक्के वसूली

२७ नळ कनेक्शन बंद तर ५ दुकान गाळे सील

मुरगूड ( शशी दरेकर ):- मुरगूड नगरपालिकेने २०२५ – २६ या आर्थिक वर्षात फाळा वसुलीची मोहीम अधिक वेगवान केली असून १५ मार्च पर्यंत पालिकेकडे  ७५.६९ टक्के मालमत्ता कर वसुली झाली आहे. तर पाणीपट्टी वसुली ७५ टक्के झाली आहे . थकबाकीदारांपैकी २७ जणांची नळ कनेक्शन बंद करण्यात आली असून ५ दुकान गाळे सील करण्यात आले आहेत . तर २१ गाळेधारकांना   जप्तीच्या नोटिसा लागू केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. 

           मार्च अखेरच्या निमित्ताने घरफाळा आणि पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या दारात जाऊन रकमा वसूल करत आहेत. मालमत्ता करातून पालिकेकडे  १ कोटी ४१ लाख पैकी १ कोटी ६ लाख ९४ हजार  तर पाणीपट्टीची ३५ लाख ३० हजार रू. पैकी २६ लाख ३३ हजार वसूली झाली आहे.

Advertisements


           तसेच नगर परिषदेकडून ज्या नागरिकांचे नळ कनेक्शन बंद व गाळे सील करण्यात आले आहेत. त्या नागरिकांनी परस्पर कनेक्शन जोडणी केल्याचे निदर्शनास आल्यास नगरपरिषदे कडून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!