बातमी

अवचितवाडीत अकोल्याच्या ऊसतोड कामगाराचा खून : भावाला मारहाण केल्याचा राग : आरोपी अटक

मुरगूड ( शशी दरेकर ) :
भावाला मारहाण केल्याच्या रागातून लाकडी ओंडका डोक्यात घालून ऊसतोड कामगारांने दुसऱ्या ऊसतोड कामगाराचा निर्घूण खून केला. संजय फुलचंद जामूनकर रा. वारी हनुमान (भैरवगड) ता. तिल्हारा जि. अकोला असे खुन झालेल्याचे नाव आहे. अवचितवाडी ता. कागल येथे सोमवारी रात्री ही घटना घडली. मुरगूड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद आज पहाटे करण्यात आली. आरोपी सुनील जामुनकर याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अवचितवाडीत विनायक मोरबाळे यांच्या ट्रेक्टरवर ऊसतोड टोळीमध्ये मयत संजय फुलचंद जामूनकर आणि आरोपी सुनील नंदूलाल जामुनकर हे दोघे ऊसतोड कामगार होते. एकाच गावात राहणारे हे दोघे एकमेकाचे चांगले मित्रही होते. काल रात्री ९ वा. च्या सुमारास करी नावाच्या शेतात गट नं. ५८ मध्ये उसतोड चालू असताना संजय जामुनकर याचे सुनिलचा भाऊ असणाऱ्या अनिल जामुनकर बरोबर किरकोळ कारणावरुन भांडण सुरू होते. ‘माझ्या भावाबरोबर तू का भांडत आहेस ? ‘ असा जाब विचारत सुनिलने संजयच्या डोक्यात लाकडी ओंडका मारला. घाव वर्मि बसल्याने संजय जागेवरच कोसळला.

ट्रॅक्टर मालक विनायक मोरबाळे यांनी गंभीर जखमी अवस्थेत संजयला मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच संजय मयत झाल्याचे सांगितले. विनायक शंकर मोरबाळे रा. अवचितवाडी यांनी घटनेची मुरगूड पोलिसात फिर्याद नोंदवली. ग्रामीण रुग्णालयात मयताचे शवविच्छेदन झाल्यावर नातेवाईकांनी पहाटे मृतदेह गावी अंत्यसंस्कारासाठी नेला. गुन्ह्याची नोंद पहाटे अडीच वा.च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांनी केली. अधिक तपास मुरगूड पोलीस करत आहेत.
………………………………………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *