मुरगूड ( शशी दरेकर ) – युरोप खंडातील इस्टोनिया येथे २२ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत होणाऱ्या ३५ देशातील ७२ क्लब मधील १५ वर्षाखालील निमंत्रित मल्लांच्या कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून राज्य,राष्ट्रीय कुस्ती पंच व निवेदक पैलवान मारुती उर्फ बटू जाधव यांची निवड झाली आहे.
युरोप खंडातील इस्टोनिया या देशात २२ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत मुलांच्या फ्री स्टाईल व ग्रिको रोमन तर मुलींच्या फ्री स्टाईल कुस्तींच्या लढती पहावयास मिळणार आहेत.
या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून पै.शुभदा राजू केसरकर, पै.त्रिशा किशोर गोंद,आणि पै.ओम योगेश मेमाणे या तीन मल्लांची निवड करण्यात आली आहे.तर त्यांचे प्रशिक्षक म्हणून मारुती उर्फ बटू जाधव हे काम पाहणार आहेत.अनेक वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून जाण्याचा मान कोल्हापूर जिल्ह्याला बटू जाधव यांच्या रुपाने मिळालेला आहे.तर सुमारे ५८ देशातील कुस्ती स्पर्धेत पंच म्हणून कामगिरी बजावणारे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच पैलवान दिनेश गुंड हे या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे पंच म्हणून काम पाहणार आहेत.
श्री.जाधव यांची जोग महाराज व्यायाम शाळा आळंदी – पूणे यांच्या क्लबमार्फत निवड झाली आहे.त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र केसरी स्पर्धेसह खासबाग,वारणा येथील नावाजलेल्या कुस्ती मैदानातील लढतींचे समालोचन केलेले आहे.तसेच सरपंच म्हणूनही वेळोवेळी काम पाहिलेले आहे. शिवाय त्यांनी ऑलम्पिक वीर राजू तोमर, नरसिंह यादव, इराणचा मल्ल हाजी इराणी,पाकिस्तानचा मल्ल रझा,ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी,पै.असलम काझी यांच्यासह अनेक दिग्गज मल्लांच्या कुस्ती लढतीचे पंच म्हणून काम पाहिलेले आहे.
स्वतः राष्ट्रीय खेळाडू असणारे बटू जाधव हे भुदरगड तालुक्यातील गंगापूर गावचे आहेत.गेली २० वर्षे ते कुस्तीचे पंच म्हणून काम पाहत आहेत.तसेच अनेक स्पर्धा आयोजनातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो.या सर्व गोष्टींचा विचार करुन त्यांची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.