collector
बातमी

प्रशासन व लोकप्रतिनिधी मिळून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान यशस्वी करु – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

9 ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक गावात एकाच दिवशी विविध पाच कार्यक्रमांचे आयोजन

कोल्हापूर :  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय कार्यक्रमांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ या अभियानाची तयारी प्रत्येक गावात व शहरात अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी मिळून ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान यशस्वी करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केले. या अभियानात नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविण्याचेही आवाहन त्यांनी केले. दिनांक 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत शिलाफलक, पंच प्रण शपथ, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन या कार्यक्रमांसह प्रत्येक घरी व कार्यालयात तिरंगा फडकविण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोपीय उपक्रमांतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान राबवण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांद्वारे जिल्हावासियांना अभियानात सहभागी होण्याबाबत आवाहन केले.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, हे अभियान 9 ते 14 ऑगस्ट 2023 दरम्यान राबवण्यात येणार आहे. या काळात ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपरिषद याठिकाणी गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे, असे सांगून  ते म्हणाले, या अभियानांतर्गत गावातील महत्त्वाच्या ठिकाणी शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त देशभक्तीपर अन्य विविध कार्यक्रम आयोजित करुन अभियानात लोकप्रतिनिधी व अधिकाधिक नागरिक सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानांतर्गत सर्व कार्यक्रम योग्य नियोजनातून मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत.

असे असणार पाच कार्यक्रम-

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच गावे व शहरात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान राबविले जाणार आहे. दिनांक 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रशासनाने दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कोणत्याही एका दिवशी सर्व पाच कार्यक्रमांचे आयोजन करावयाचे आहे. यामधील शिलाफलकावरील नावांमध्ये गावातील हयात असलेले किंवा मयत स्वातंत्र्य सैनिकांचे नाव, आर्मी, नेव्ही, वायू सेना, पोलीस विभागातील  शहीद झालेल्या वीरांची नावे लिहिली जाणार आहेत. दुसऱ्या कार्यक्रमात वसुधा वंदन होणार आहे. गावातील योग्य ठिकाण निवडून  75 भारतीय वृक्षांच्या रोपांची लागवड करुन अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे.

या वाटिकेतील मातीला वंदन करुन मातीचा अमृत कलश तयार करण्यात येणार आहे. त्यासोबत नागरिकांनी सेल्फी काढून सामाजिक माध्यमे व Yuva.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे. तिसऱ्या कार्यक्रमात वीरांना वंदन करुन त्यांनी दिलेल्या व देत असलेल्या योगदानाचे स्मरण करुन अभिवादन करावयाचे आहे. यावेळी देश सेवेत असलेल्या त्या-त्या गावातील जवानांचा त्यांच्या कुटुंबियांसह सन्मान करण्यात येणार आहे. चौथ्या कार्यक्रमात हातात माती किंवा मातीचे दिवे घेऊन उपस्थितांना पंचप्रण शपथ दिली जाणार आहे. तर पाचव्या कार्यक्रमात घरोघरी तिरंगा उभारुन अभियानाची सांगता करावयाची आहे. या दिवशी मातीचा अमृत कलश पंचायत समिती येथे पोहोच करण्यात येणार आहे.

One Reply to “प्रशासन व लोकप्रतिनिधी मिळून ‘मेरी माटी मेरा देश’ अभियान यशस्वी करु – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

  1. “माझी माती माझा देश ” चांगला उपक्रम आहे.
    ज्या मातीत आपण जगत आहोत आपलं कुटुंब जगत आहे त्या मातीचे आपण सर्वांनी आभार मानायला हवेत 🙏ज्या मातीचे आपल्यावर उपकार आहत त्याची अद्रता टिकून राहण्यासाठी झाडे लावणे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे व ज्यांच्या व ज्यांच्या मुळे आपण आज स्वातंत्र्याचे जीवन जगत आहोत ज्यांनी स्वातंत्र् मिळवन्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना माणवंदना देणे आपले कर्तव्य पूर्ण जबाबदारी आहे. त्या मुळे मि जिल्हाधिकारी साहेब यांचे आभार मानतो कि आपण संपूर्ण जिल्ह्यात “मेरी मिठी मेरा देश “उपक्रम घेत आहात.🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *