मुरगूड ( शशी दरेकर ) : सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने हळदी ता. कागल येथे आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराअंतर्गत पशु चिकित्सा शिबिराचे उद्घाटन पशुधन विकास अधिकारी डॉ. राजू धनगर यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडले.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. धनगर म्हणाले की, “पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा खरा कणा आहे. शेतीला पूरक उत्पन्न, कुटुंबाची आर्थिक स्थैर्य, दुधउत्पादन, शेणखत व जैविक शेतीसाठी पशुधनाचे योगदान अनन्यसाधारण आहे. पशुधन निरोगी राहिल्यासच ग्रामीण विकासाची गती वाढू शकते.”

या शिबिरामध्ये परिसरातील शेतकरी व पशुपालकांच्या गायी, म्हशी, शेळ्या व इतर पशुधनांची मोफत आरोग्य तपासणी, लसीकरण, जंतनाशक औषधोपचार तसेच आजार प्रतिबंधक मार्गदर्शन करण्यात आले. जनावरांच्या वेळेवर लसीकरणामुळे उत्पादनक्षमता वाढते व आजारांवरील खर्च कमी होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. धनगर यांनी आधुनिक पशुपालन पद्धती, संतुलित आहार, स्वच्छ गोठा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व जनावरांच्या कल्याणाबाबत सविस्तर माहिती दिली. विशेषतः शेळीपालन, दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धनाच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.
या पशु चिकित्सा शिबिरामुळे ग्रामीण भागातील पशुधन आरोग्य संवर्धनास चालना मिळाली असून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण झाली आहे. या उपक्रमातून एन.एस.एस. स्वयंसेवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव व श्रमप्रतिष्ठेची जाणीव अधिक दृढ झाली.
या कार्यक्रमास रामचंद्र वडर, दीपक कुंभार, कादरपाशा पाटील, डॉ सर्जेराव मोरे, संतोष पोवार, बाबासो पाटील, भगवान शंकर तिकोडे, भगवान कृष्णा तिकोडे, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा दीपक साळुंखे , प्रा दिगंबर गोरे, प्रा संजय हेरवाडे,प्रा सुशांत पाटील, प्रा रामचंद्र पाटील, प्रा संदीप मोहिते ,प्रा विनायक माने, प्रा स्वप्नील मेंडके ,प्रा सोनाली कुंभार,प्रा सोहम डाफळे ,प्रा अवधूत पाटील,प्रा एस आर पाटील,प्रा समृद्धी मोरे, प्रा आदिती भामरे, रोहित परीट स्वयंसेवक विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु निलम थोरवत हिने केले तर आभार कु नयन मोरे यांने केले तर सूत्रसंचालन कु वैष्णवी कुंभार हिने केले. या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन छत्रपती शंभुराजे ग्रुपने केले.