कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये हातकणंगले तसेच पन्हाळा तालुक्यामध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पण झाले आहे. लम्पी आजाराबाबत पशुपालकांनी घाबरुन न जाता नियमांचे पालन करावे, असे आवाहन पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र सिंह यांनी केले आहे.
लम्पी चर्म रोगाचा फैलाव बाहय किटकाव्दारे (मच्छर, गोचीड, गोमाश्या ) तसेच आजारी पशुच्या त्वचेवरील व्रणामधुन वाहणारा स्त्राव, नाकातील स्त्राव, लाळ, वीर्य व इतर स्त्रावामुळे होत असल्याने पशुपालकांनी मच्छर, गोचीड, गोमाश्या यांचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घ्यावी.
लम्पी चर्मरोग बाधीत पशुमध्ये दिसून येणारी लक्षणे पाहता या आजारात पशुना ताप येणे पुर्ण शरीरावर 10-15 मि.मि. व्यासाच्या कडक गाठी येणे, तोंड, नाक व डोळयात व्रण निर्माण होणे, चारा चघळण्यास त्रास होणे, अशक्तपणा, भुक कमी होणे, वजन कमी होणे, दुध उत्पादन कमी होणे, डोळयातील व्रणामुळे दृष्टी बाधीत होणे, काही वेळा फुफुसदाह किंवा स्तनदाह होणे, पायावर सुज येणे, लंघडणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात होणे अशी लक्षणे दिसून येतात.
वरील लक्षणे दिसून आल्यास पशुपालकांनी घाबरुन न जाता तात्काळ नजिकच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क पशुचा उपचार करुन घ्यावेत. उपचार व लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण मोफत आहे. गांवामध्ये लम्पी चर्मरोगाची बाधा आढळुन आल्यास तेथे इपीसेंटर स्थापन करण्याच्या करण्यात येणार आहे. त्यानुसार सदर इपीसेंटरच्या 5 कि.मि.च्या त्रिज्येमध्ये येणा-या गावांमध्ये मोफत लसीकरण व बाधीत जनावरांवर उपचार करण्यात येणार आहे.
पशुपालकांनी आपल्या गोवर्गीय पशुधनास लम्पी चर्मरोग लस टोचून घ्यावी. सदरचा आजार झाल्यानंतर उपचार योग्य वेळेत मिळाल्यावर जनावरे लवकर बरी होतात. पशुपालकांनी लम्पी आजाराबाबत घाबरुन जावु नये. आजार प्राधान्याने केवळ गोवर्गीय पशुधनास होतो असे आढळुन आले आहे. रोगाबाबत आफवा पसरवणा-यांनवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हामध्ये तात्काळ शिघ्र कृती दले (आर.आर.टी.) स्थापन केली आहेत. सहकारी दुग्ध संस्थेकडील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने बाधीत क्षेत्रामध्ये लसीकरण व उपचार करण्याचे कामकाज चालू आहे.
लम्पी रोगाची लक्षणे पशुमध्ये आढळुन आल्यास प्रत्येक व्यक्ती/ अशासकीय संस्था/ संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी लेखी स्वरुपात नजीकच्यास पशुवैद्यकिय संस्थेस तात्काळ कळवावे. दिरंगाई केल्यास खासगी पशुवैद्यक, पशु व्यापारी, वाहतुकदार यांच्या विरुध्द गुन्हा नोंद केला जाईल याची दखल घ्यावी. हा रोग एका राज्यातुन दुस-या राज्यात / एका जिल्हातुन दुस-या जिल्हात बाधीत जनावरांची वाहतुक केल्यामुळे बाधीत जनावरांपासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हातील गोजातीय तसेच म्हैस जातीय यांची कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.
गोजातीय प्रजातीची गुरे व म्हैशीचा कोणताही प्रकारचा बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती लावणे, प्राण्याची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजीत करणे आणि नियंत्रीत क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम पार पाडणे यांस मनाई करण्यात आली आहे. जनावरे मोकाट सोडणे, यांस मनाई असून असे आढळुन आल्यास पशुपालकांवर गुन्हा नोंदविण्यात येईल. असे जरी असले तरी शेळया मेंढयांचे बाजार भरविणेस कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करण्यात आलेला नाही.