24/09/2022
0 0
Read Time:6 Minute, 51 Second

कोल्हापूर : गेली दीड वर्ष जिल्ह्यातील नागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. या लढ्यात आपण काही प्रमाणात यशस्वी झालो. मात्र यापुढे गाफील राहून चालणार नाही. नागरिकांनी, ‘माझ कोल्हापूर-निरोगी कोल्हापूर’ हा संकल्प सिध्दीस नेण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

        भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला. यावेळी छत्रपती शाहू महाराज, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते.

          ध्वजारोहणानंतर बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने आगामी काळात नदीकाठच्या गावाचं शंभर टक्के पुनर्वसन करण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे सांगून जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांसाठी यंदा ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’ सुरु केल्याने आपण जीवित व पशूहानी टाळण्यात यशस्वी झालो. तसेच ही सिस्टीम टप्याटप्याने संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. तत्पूर्वी पूरपरिस्थितीत साडेतीन लाख लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याने प्रशासनाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या तिसऱ्या लाटेकडे नागरिकांनी दुर्लक्ष करु नये. या इशाऱ्याला गांभिर्याने घ्यावे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य विभागाची जरी तयारी झाली असली तरी नागरिकांनी स्वंयप्रेरणेने मास्क, सॅनिटयझर याचा वापर करावा तसेच सुरक्षित अंतर पाळावे, विनाकारण गर्दी टाळावी असे आवाहन केले.

          ते पुढे म्हणाले, अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे 59 हजार हेक्टर कृषी क्षेत्र बाधित झाले आहे.  याचे पंचनामे सुरु असून आगामी काही दिवसात पंचनामे पूर्ण होतील. जिल्ह्यातील पूरबाधितांना सानुग्रह अनुदानासाठी आगाऊ मदत म्हणून शासनाकडून सुमारे 17 कोटी 42 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील 24 लाख लाभार्थ्यांना सुमारे 36 हजार मेट्रीक टन गहू व तांदळाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर 10 हजारहून अधिक रिक्षा चालक-मालकांना राज्य शासनाच्यावतीने दीड हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नगारिकांचा विकास ही माझी विकासाची संकल्पना असल्याचे स्पष्ट करुन, वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी प्लॅस्टीक मुक्तीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

          शासकीय ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील स्वातंत्र सैनिकांची आस्थेने विचारपूस करुन त्या सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर राजर्षी शाहू हॉलमध्ये छोटेखानी कार्यक्रमामध्ये स्वामीत्व गावठाण योजनेंतर्गत येणाऱ्या मिळकतीपैकी सर्वश्री हनमंत व दिनकर पराळ यांना प्रतिकात्मक स्वरुपात प्रत्येकी एक-एक मिळकत पत्रिका पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रीय खेळाडू समर्थ पांढरबळे, युवराज सुर्यवंशी तसेच महसूल विभागात उत्कृष्ट काम करणारे दिलीप सणगर, संदीप भुतल, गजानन मेघमाळे, राजकुमार बोराटे, दिनकर कांबळे, दिलीप म्हापसेकर, राजू पचिंद्रे, श्रीमती अर्चना गुळवणी आदींचा प्रमाणपत्र व पुष्प देवून  पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे,   जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, प्रांताधिकारी वैभव नावडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी (महसूल) श्रावण क्षीरसागर, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांच्यासह इतर विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय सोनार यांनी तर निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे आभार प्रदर्शन केले.

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | ChromeNews by AF themes.
error: Content is protected !!