कागलमध्ये योजनेच्या अंमलबजावणी प्रशिक्षण कार्यशाळेला प्रतिसाद
कागल, दि. १ : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना” ही अत्यंत महत्त्वकांक्षी आणि माता-भगिनींना दिलासा देणारी आहे. पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर करूया, असे आवाहन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. एकही पात्र माता- भगिनी या योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी सचोटीने परिश्रम घ्या, असेही ते म्हणाले.
कागल येथील छत्रपती शाहू सांस्कृतिक हॉलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीविषयी आयोजित कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेमध्ये श्री. माने बोलत होते. कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. हवेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते जोतिराम मुसळे होते.
एकही पात्र माता -भगिनी योजनेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्या
भाषणात श्री. माने पुढे म्हणाले, आमचे नेते पालकमंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी विकासकामांचा तर डोंगरच उभारलेला आहे. तसेच; वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजना राबविण्यातही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक मिळविलेला आहे. माता- भगिनींचे आशीर्वाद ही तर त्यांची कवचकुंडलीच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना ही गावोगावी, वाड्यावस्त्यांवर घरोघरी पोहोचवूया, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना श्री. माने म्हणाले, या योजनेत माता-भगिनींचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत एक ते पंधरा जुलै पर्यंत आहे. सुरुवातीला आवश्यक असणारी माता-भगिनींचा रहिवाशी दाखला, अडीच लाखाच्या आतील उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड ही कागदपत्रे घरोघरी जाऊन गोळा करा. आपल्या अँड्रॉइड फोनवर “नारी दूत ॲप” डाऊनलोड करा. त्यानंतर ऑनलाइन फॉर्म भरा. फॉर्म भरताना लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करा.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन……..!
कार्यशाळेत बहुतांशी वक्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार या दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. शेतकरी, महिला आणि युवक कल्याणाच्या महत्त्वकांक्षी योजना अर्थसंकल्पात समाविष्ट केल्याबद्दल महायुती सरकारचे अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कागल तालुका अध्यक्ष विकास पाटील-कुरुकुलीकर, विजय काळे यांचीही मनोगते झाली.
व्यासपीठावर कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ, माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, जोतीराम मुसळे, ॲड. जीवनराव शिंदे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर. व्ही. पाटील, पैलवान रविंद्र पाटील, सदाशिव तुकान, प्रवीण काळबर, सुभाष चौगुले, दत्ता पाटील, बंटी पाटील, सदानंद पाटील, अनुप पाटील, गुंडेराव पाटील, महेश सलवादे, रश्मीराज देसाई, उदय परीट, विजयसिंह पाटील, नितीन दिंडे, संजय चितारी, नारायण पाटील, राजेंद्र पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील यांनी केले. प्रास्ताविक अमर मांगले यांनी केले. सूत्रसंचालन राहुल सोनटक्के यांनी केले. आभार सुधीर सावंत यांनी मानले.