पिंपळगाव खुर्द (मारुती पाटील) : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मा.आमदार स्वर्गीय दौलतराव निकम यांनी आपलं संपूर्ण हयात आदर्शवादी, तत्त्ववादी अशा विचारसरणीत व्यतीत केलेली आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
व्हन्नुर ता.कागल येथील माजी आमदार स्वर्गीय दौलतराव निकम जन्मशताब्दी महोत्सव प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार संजय घाटगे होते.
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, दौलतराव निकम यांनी आपल्या जीवनात कसलीही तडजोड केली नाही. साधे राहणीमान व उच्च विचारसरणी असलेले ते आमदार होते. राजकारणामध्ये व समाजकारणामध्ये उत्तम आदर्श असावा. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दौलतराव निकम होत. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे ते अनुयायी होते. यांना ते नेते मानत होते. त्यांचा एकही शब्द त्यांनी कधीही ओलांडला नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी जेल ही भोगले. असे सांगत ते म्हणाले, मी जन्मशताब्दी महोत्सवाचा अध्यक्ष झालो. आणि माझ्या मागे ईडी लागली. यामध्ये सहा महिने गेले. खऱ्या अर्थाने मला या कार्यक्रमासाठी शरदचंद्र पवार यांना आणायची माझी इच्छा होती. त्यांना बोलूनही दाखल होतं. पण नाट्यमय घडत गेलं त्यामुळे मी न्याय देऊ शकलो नाही. त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
यावेळी बोलताना माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, स्वर्गीय दौलतराव निकम हे एक स्वातंत्र्य सेनानी होते. ते आमदार होते तरी त्यांचे राहणीमान हे सर्वसामान्य जनतेसारखेच होते. त्यांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे.
यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मा.आमदार स्वर्गीय दौलतराव निकम स्वागत कमानीचे उद्घाटन हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास शिक्षक नेते दादासाहेब लाड, संस्था अध्यक्षा सुनंदा निकम, सरपंच पूजा मोरे, उपसरपंच मंगल कोकणे, यशवंतराव निकम, माधवराव निकम, नेताजी मोरे, आनंद खापणे, गौतम कांबळे, संजय शिंदे आदींसह शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.