कागल येथील ‘शाहू सृष्टी’ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करा- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात प्रकल्पाचे सादरीकरण

मुंबई, दि. १ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव त्यांचे कार्य, विचार आणि सामाजिक सुधारणांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कागल येथे जागतिक दर्जाची ‘शाहू सृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ‘शाहू सृष्टी’ हा केवळ संग्रहालय न राहता इतिहास, संस्कृती, शिक्षण, पर्यटन आणि निसर्ग यांची सुंदर सांगड घालणारे जागतिक दर्जाचे आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

Advertisements

आज मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या दालनात प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. कागल नगरपालिका आणि राज्य शासनाच्या निधीतून साकारण्यात येणारा हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी नगरपालिकेची सुमारे २० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. याबाबत थ्रीडी आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, कागलचे उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर, शाहू कारखाना संचालक युवराज पाटील, विक्रमसिंह घाटगे बँकेचे संचालक एम. पी. पाटील, पाणी पुरवठा सभापती प्रकाश गाडेकर, आनंदा पसारे, विकास पाटील आदी उपस्थित होते.

Advertisements

हा प्रकल्प मंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून उभा राहणार आहे. प्रस्तावित सुविधा आणि विकास आराखड्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रस्तावित ‘शाहू सृष्टी’मध्ये शाहू महाराजांच्या जीवनकार्याची आणि सामाजिक विचारांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मांडणी करणारे जीवनकार्य आणि वारसा, तसेच पर्यटकांसाठी विविध सुविधा असलेला पर्यटक सुविधा क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. संग्रहालय, ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती, डिजिटल माहिती केंद्र, प्रदर्शन दालने, अॅम्फिथिएटर, स्थानिक खाद्यपदार्थ व स्मृतिचिन्हांची दुकाने, साहसी उपक्रमांसाठी अडव्हेंचर पार्क, क्लब हाऊस, पर्यटन निवासाची सुविधाही प्रस्तावित आहे.

शाहू महाराजांचे शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, कला, क्रीडा, उद्योग आणि लोककल्याण यातील योगदान तसेच त्यांचे दूरदृष्टीपूर्ण विचार आधुनिक आणि अनुभवाधारित पद्धतीने पर्यटक व विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी संशोधन, अध्ययन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी स्वतंत्र प्रशासकीय व शैक्षणिक केंद्राचीही संकल्पना मांडण्यात आली आहे.

Advertisements

‘शाहू सृष्टी’च्या विकासाला व्यापक स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोरही प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कागलच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याबरोबरच राजर्षी शाहू महाराजांचा समतावादी आणि पुरोगामी विचार देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. सादरीकरण शाहू सृष्टीचे आर्किटेक्ट आदित्य बेगमपुरे यांनी केले.
‘शाहू सृष्टी’मध्ये इतिहास, शिक्षण, पर्यटन आणि मनोरंजनाचा अनोखा संगम

• राजर्षी शाहू महाराजांचे जीवन, कार्य, सामाजिक विचार आणि सुधारणांचा प्रवास आधुनिक पद्धतीने पर्यटकांसमोर मांडला जाणार आहे.
• आधुनिक संग्रहालय- आधुनिक प्रदर्शन तंत्रज्ञान आणि अनुभवाधारित मांडणीच्या माध्यमातून शाहू महाराजांचे जीवनकार्य व सामाजिक योगदान उलगडले जाणार.
• संग्रहालयाच्या परिसरात महाराणी लक्ष्मीबाई जलाशय ( (राधानगरी धरण) आणि रंकाळा तलावाच्या प्रतिकृती साकारण्यात येणार आहेत.
• परिसराचे प्रमुख आकर्षण म्हणून शाहू महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या वास्तूंच्या प्रतिकृतीही साकारल्या जाणार आहेत.
• शाहू महाराजांचे जन्मस्थान आणि जीवनप्रवासाशी संबंधित वास्तूंच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत.
• शाहू महाराजांच्या विविध क्षेत्रांतील योगदानाची आधुनिक आणि अनुभवाधारित पद्धतीने मांडणी केली जाणार आहे.
• पर्यटकांच्या सोयीसाठी विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
• झिपलाइन, रोप-कोर्स आणि इतर साहसी उपक्रमांची सुविधा प्रस्तावित आहे.
• बँक्वेट हॉल, प्रशस्त लॉन, रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, जीम, इनडोअर गेम्स अशा सुविधा प्रस्तावित आहेत.
• कॉटेज, डॉर्मिटरी तसेच निसर्गरम्य परिसरात पर्यटकांच्या निवासासाठी विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत.
• पर्यटकांसाठी खाद्यपदार्थांची व्यवस्था तसेच स्थानिक उत्पादने व स्मृतिचिन्हांच्या विक्रीची सुविधा असेल.
• कला, संस्कृती आणि विविध कार्यक्रमांसाठी खुल्या रंगमंचाची सुविधा प्रस्तावित आहे.
• संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात हिरवाई विकसित करून निसर्गाशी सुसंगत वातावरण निर्माण केले जाणार आहे.
• शाहू महाराजांच्या विचारांचे अध्ययन, संशोधन आणि समाजजागृतीसाठी स्वतंत्र प्रशासकीय व शैक्षणिक केंद्र विकसित केले जाणार आहे.
• शाहू महाराजांच्या कार्याची माहिती डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
• विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी बहुउद्देशीय सभागृहाची सुविधा असेल.

Leave a Comment

error: Content is protected !!