कागल तहसीलदार कार्यालयात वाद; माझ्यावर खोटा गुन्हा दाखल, राज कांबळेंचा पत्रकार परिषदेत दावा

कागल (प्रतिनिधी) : सामाजिक कामासाठी मी तहसीलदार कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी किरकोळ वादावादीचा प्रकार घडला. त्यातून त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तो पूर्णपणे चुकीचा आहे. न्याय दंडाधिकारी सारख्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात जाऊन माझ्यावर गुन्हा दाखल करणे हे पूर्णतः चुकीचे आहे. त्यांच्या दालनातील सीसी टीव्ही चित्रीकरण तपासल्यानंतर सत्य समोर येईल.

Advertisements

उलट या कार्यालयात कोणतेही काम सरळ मार्गाने न होता तेथे आर्थिक व्यवहारच होत असतात. तसे पाहिले तर तहसीलदार हे जनतेचे सेवक असताना ते अर्थकारण करतात हे दुर्दैव आहे. उलट त्यांनीच जातिवाचक बोलून माझा अवमान केला आहे. अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते राज कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Advertisements

याबाबत अधिक माहिती देताना कांबळे म्हणाले मी एका कागदपत्रा वर सही घेण्यासाठी गेलो होतो. त्यांनी माझ्यावर एजंटचा असल्याचा आरोप केला.  त्यांनी माझ्याशी वाद घातला. त्यावरून त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे.

     वास्तविक पाहता मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानणारा एक दलित समाजाचा कार्यकर्ता आहे. मी तहसीलदार यांच्या दालनात बेताल वक्तव्य व शिवीगाळ केलेली नाही. त्यांचे तसे त्यांचे म्हणणे असेल तर त्यांच्या दालनातील चित्रीकरण तपासावे. असे सांगत राज कांबळे म्हणाले तहसीलदारांनी महार या जातीचा उल्लेख केला.

Advertisements

त्यावेळी माझा आवाज वाढला व जाती वरती बोलू नका साहेब असे मी बोललो. उलट त्यांनीच माझ्यावर पोलिसांमध्ये तक्रार दिली. तहसीलदार साहेब हे ज्ञानी व न्यायदंडाधिकारी आहेत असे असताना. माझ्यावरच तक्रार दाखल करत असाल तर आम्ही न्याय मागायचा कुणाकडे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

      एक सामाजिक काम कार्यालयात  घेऊन गेलो असता एक अधिकारी हे काम चुकीचे आहे असे सांगतात तर दुसरे अधिकारी  हे काम बरोबर आहे असे म्हणतात. म्हणजे या अधिकाऱ्यांमध्येच समन्वयाचा अभाव आहे. हा प्रकार म्हणजे अशिक्षितपणाचा कळस झाला आहे.

          भविष्यात विविध प्रश्नां संदर्भात आंदोलने व मोर्चे निघतील. जनतेतून आक्रोश निर्माण होईल. अशाप्रसंगी तहसीलदार साहेब तुम्ही त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणार काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

              आम्ही कार्यकर्ते बहुजन समाजाच्या संघर्षातून निर्माण झालो आहोत. आमच्या समाजाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीतून मुक्त करून माणूस म्हणून जगण्याची संधी दिली. असे असताना तुम्ही आम्हाला जातीवाचक संबोधन आमचा अवमान करत आहात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. तहसीलदार पदावर असलेल्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी माझ्यावर खोटी तक्रार दाखल करणे हे निंदनीय आहे.

   यावेळी साखर कारखान्याचे संचालक अनिल सिद्धेश्वर, दयानंद कांबळे, यांच्यासह अनेक उपस्थितांनी तहसीलदारांचा निषेध केला. पत्रकार परिषदेस बाबासाहेब कागलकर, लखन हेगडे आशिष कांबळे ,विजय कुरणे ,विजय कांबळे, महेश माणगावकर, यशवंत कांबळे ,अनिल कांबळे, विवेकानंद कांबळे, सागर कांबळे , शिवसेना शिंदे गट, सम विचारी पक्ष आणि विविध संघटनांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!