मुरगूडमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड “राष्ट्रसेवेचे संस्कार हे घरापासूनच सुरू झाले पाहिजेत, अशी महत्त्वाची शिकवण राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी आपल्या कृतीतून दिली आहे,” असे उद्गार मुरगूडच्या नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील यांनी काढले.
मुरगूड नगरपरिषदेसमोरील ‘सेवा तीर्थ’ येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना त्या बोलत होत्या.

आपल्या भाषणात नगराध्यक्षा पुढे म्हणाल्या की, जिजाऊ माँसाहेबांनी शिवरायांवर उत्तम संस्कार करून त्यांना घडविले, ज्यामुळे स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकार झाले. तसेच, स्वामी विवेकानंदांनी आपल्या अफाट ज्ञानाच्या जोरावर भारतीय संस्कृतीची पताका जगभर फडकविली. या महापुरुषांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत.
नूतन नगराध्यक्षा सौ. सुहासिनीदेवी पाटील व उपनगराध्यक्षा श्रीमती रेखाताई मांगले यांच्या हस्ते जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे नेटके नियोजन मुरगूडच्या ‘शिवभक्त संघटने’मार्फत करण्यात आले होते.
प्रमुख उपस्थिती: नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिश वाळुंज, नगरसेवक सुहास खराडे, शिवाजीराव चौगले, सत्यजित पाटील (आबा), रणजित भारमल, राहुल शिंदे, सुनील रणवरे, सुनील मंडलिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत शिवभक्त सर्जेराव भाट यांनी केले, तर प्रास्ताविक मुरगूड पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी हाजी धोंडीराम मकानदार यांनी सर्वांचे आभार मानले.
या सोहळ्याला जगन्नाथ पुजारी, दीपक शिंदे, राजू कांबळे, संतोष भोसले, व्ही. आर. भोसले सर, तानाजी भराडे, महादेव वागणेकर, शिकंदर जमादार, महादेव वागणेकर, शिवाजी चौगले, प्रकाश पारिषवाड, जगदीश गुरव, विशाल कापडे, संकेत भोसले यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.