बातमी

कोल्हापुरातील आयटी पार्क कालमर्यादेत पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दि ५ – कोल्हापूरात आयटीपार्कच्या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी  रोजगाराच्या संधी निर्माण करणे गरजेचे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३० हेक्टर जागा आयटीपार्कसाठी द्यावी. विद्यापीठाला विविध प्रकल्पांसाठी ५० हेक्टर पर्यायी जागा उपलब्ध करावी. कालमर्यादेत आयटीपार्क पूर्ण न केल्यास संबंधित जमीन कृषी विद्यापीठास हस्तांतरीत करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

कोल्हापूर आयटीपार्कसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी कृषी आणि उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.

वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील, वित्तचे अपर मुख्य सचिव नितिन करीर, महसुलचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, कोल्हापूरचे वाढते शहरीकरण आणि लोकसंख्या पाहता तेथे आयटीपार्क होणे आवश्यक आहे. तेथील तरूणांना यामुळे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. कृषी विद्यापीठाची रिकामी ३० हेक्टर जागा यासाठी वापरण्यात यावी व विद्यापीठाला पर्यायी ५० हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. शहरातील या क्षेत्रापासून विमानतळ आणि पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुणे नंतर कोल्हापूर शहर हे एक चांगला पर्याय आहे. कालमर्यादेत आयटीपार्क न उभारल्यास संबंधित जमीन कृषी विद्यापीठाला पुन्हा हस्तांतरीत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, कोल्हापूर शहरात असलेले शासकीय आयटीपार्क पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *