बंद असलेल्या कुरणी पुलावरून जाण्याचा बेजबाबदारपणा नडला; मोटरसायकल नदीत कोसळून दुचाकीस्वार व लहान मुलगा जखमी

मुरगूड ( शशी दरेकर ):- कुरणी मार्गावरील बंद करण्यात आलेल्या पुलावरून जाण्याचा प्रयत्न एका दुचाकीस्वाराला महागात पडला. पुलावरून जाण्याच्या प्रयत्नात मोटरसायकल थेट नदीमध्ये कोसळून दुचाकीस्वार व त्याच्या पाठीमागे बसलेला लहान मुलगा जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली.
कुरणी पुलाचे पिल्लर कोसळल्यामुळे प्रशासनाने हा पूल पूर्णपणे बंद केला आहे. दोन्ही बाजूंनी मुरूम टाकून रस्ता अडवण्यात आला असून नागरिकांना या मार्गाने जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र सुमारे दोन किलोमीटरचा वळसा टाळण्यासाठी काहीजण जीव धोक्यात घालून मुरूमावरूनच वाहन नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आज सकाळी अशाच प्रकारे एक दुचाकीस्वार पुलावरून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याची मोटरसायकल घसरली आणि थेट नदीमध्ये कोसळली. या अपघातात दुचाकीस्वारासह पाठीमागे बसलेला लहान मुलगा  जखमी झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले.
नदीत पडलेली मोटरसायकल बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मोठी शर्थ केली. यामध्ये आशिष जगदाळे, सर्जेराव भाट, राहुल पाटील, बाजीराव हसबे, यशवंत इंदलकर, तुकाराम माने आदींनी पुढाकार घेत प्रयत्न केले.पूल बंद असूनही काही नागरिकांकडून धोकादायक पद्धतीने वाहन नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याने अशा प्रकारच्या अपघातांच्या घटना घडत आहेत. सुदैवाने या अपघातात दोघांचाही जीव थोडक्यात बचावला, अशी चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती. प्रशासनाने या मार्गावर अधिक कडक बंदोबस्त ठेवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!