कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ठेवीवरील व्याजदरात भरघोस वाढ करण्याचा निर्णय अध्यक्ष आ. हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे ठेवीवरील कमाल व्याजदर साधारणतः ७.९० टक्के होतो. लवकरच बँकेने नऊ हजार कोटी रुपयांच्या ठेवीचे उद्दिष्ट गाठण्याचा संकल्प केला आहे.
बँकेने राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीनिमित्त यशवंत पुनर्गुंतवणूक आणि यशवंत रिकरिंग पुनर्गुंतवणूक या दोन ठेव योजना सुरू केल्या. यामध्ये ३५० हून अधिक कोटींच्या ठेवी जमा झाल्या असून, ठेवी ठेवण्यास ३१ डिसेंबर पर्यंत मुदत आहे.
आ. मुश्रीफ म्हणाले, पीककर्ज, शासकीय योजनांचा लाभ, साखर कारखान्यांची गरज असो केडीसीसी बँक या सगळ्यांमध्ये इष्टांकाच्या पुढे जाऊन काम करते. जिल्ह्यातील एकूण ठेवींपैकी २० टक्के ठेवी बँकेकडे आहेत. जिल्ह्यातील पैसा जिल्ह्यातच राहावा, जेणेकरून शेतकरी व संस्थांच्या विकासासाठी वापरात येईल. त्यासाठी बँकेच्या ठेव योजनांमध्ये ठेवी ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी खा. प्रा. संजय मंडलिक, आ. राजेश पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, प्रताप ऊर्फ भैया माने, संतोष पाटील, सुधीर देसाई, प्रा. अर्जुन आबिटकर, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.