पोलिसानीं गस्त सुरु ठेवण्याची नागरीकांतून मागणी
मुरगूड : ( शशी दरेकर ) : एकाच रात्रीत यमगेत तीन ठिकाणी तर सुरुपलीत एक अशा चार चोऱ्या झाल्या . यामध्ये लाखाचा मुद्देमाल चोरीस गेला आहे . या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलीसांच्या कामगिरीविषयी प्रश्नचिन्ह उभा आहे. मुरगूड -निपाणी मार्गावर असणाऱ्या यमगेतील दोन दुकानासह एका बंगल्यावर व सुुरुपलीत एका घरात रविवारी मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रकार घडला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : यमगेतील इंद्रजित घाटगे यांच्या नवीनच सुरू झालेल्या जी मार्ट मध्ये पाठीमागील बाजूने पत्रा उचकटून चोरटयांनी मॉलमध्ये प्रवेश केला व मॉलमधील तेलाचे डबे ‘ तांदूळ ; तुरडाळ व हरभरा डाळीच्या पिशव्या ‘ तसेच ड्रायफुड , व इतर साहित्य असा ५० ते ६० हजारचा माल चोरुन नेला. चोरट्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेराही काढून नेला. या पध्दतीनेच पन्नास फूट अंतरावरील शामराव ढेरे यांच्या मालकीच्या श्रध्दा कोल्ड्रीक्स या दुकानातही पाठीमागील पत्रा उचकटून त्यातील पाच हजारची रोकड लंपास करण्यात आली. या दोन दुकानापासून शंभर फूट अंतरावर असणाऱ्या पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय भोसले यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजाचा कडी कोंयडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश करीत बेडरूममधील तिजोरी चोरटयांनीउघडून त्यातील साहित्य विस्कटून टाकले पण त्यांच्या हाताला कांहीही लागले नाही.
यमगे पासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सुरुपली कडे चोरट्यांनी मोर्चा वळविला व मुख्य रस्त्याला लागून असलेल्या अशोक परेकर यांच्या बंद घराचे कूलूप तोडून चोरट्यांनी तिजोरीतील १५ ते १६ हजारची रोकड चोरली . या ठिकाणीच तिजोरीच्या शेजारी भितीच्या लाप्टवर असलेल्या डब्यामध्ये सहा तोळ्याचे सोन्याचे दागीने ठेवण्यात आले होते ते चोरटयांच्या हाताला सुदैवाने लागले नाहीत. हा चोरीचा प्रकार अशोक परेकर हे रविवारी सकाळी मुंबईहून घरी आल्यानंतर समजून आला या चोप्यांची मुरगूड पोलिसात नोंद झाली आहे. एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरीचे प्रकार घडल्याने ग्रामस्थांत व व्यापाऱ्यामध्ये भितीचे वातावरण आहे. पोलीसांनी सतत गस्त चालू ठेवल्यास चोरीस आळा बसेल.