कोल्हापूर : श्री क्षेत्र जोतिबा (वाडी-रत्नागिरी) येथे ३० जुलै ते ३१ जुलै २०२५ दरम्यान होणाऱ्या चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेनिमित्त वाहतूक नियमनासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.
वाहतूक बदल आणि प्रवेश बंदी :
- प्रवेश बंद: ३० जुलै रोजी ००:०१ वाजल्यापासून यात्रा संपेपर्यंत (३१ जुलै रोजी सकाळी) मालवाहू ट्रक, तीन चाकी प्रवासी आणि मालवाहतूक रिक्षा, तसेच दोन ट्रेलर असलेले ट्रॅक्टर यांना जोतिबा डोंगरावर प्रवेश बंद राहील. व्यापाऱ्यांनी आपली मालाची वाहतूक यापूर्वीच करून घ्यावी, पाणीपुरवठा टँकर वगळून.
- यात्री निवास कॉर्नरपासून पुढे आणि यमाई मंदिर कॉर्नरपासून पुढे दुचाकी वाहनांना प्रवेश बंद असेल.
- कोल्हापूर ते बोरपाडळे फाटा या मार्गावरील अवजड वाहने, मालवाहतूक करणारी वाहने, ट्रॅक्टर्स यांना ३० जुलै रोजी ००:०१ वाजल्यापासून यात्रा संपेपर्यंत आवश्यकतेनुसार प्रवेश बंद करण्यात येत आहे.
- यात्रा संपल्यानंतर ३१ जुलै रोजी पहाटे ०६:०० वाजता मोठ्या प्रमाणात वाहने घाट रस्त्याने खाली उतरणार असल्याने, टोप, केर्ली फाटा, वाघबीळ, माले फाटा (दानेवाडी), गिरोली गाव या सर्व मार्गांवरून जोतिबा डोंगरावर वाहनांना जाण्यास आवश्यकतेनुसार प्रवेश बंद केला जाईल.
- आरती सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांनी पहाटे ०६:०० वाजण्यापूर्वीच जोतिबा डोंगरावर पोहोचावे.
- केर्ली फाटा येथे एस.टी. बसेस आणि अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सर्व मोटार वाहनांना प्रवेश बंद केल्यानंतर, जोतिबा डोंगर ते केर्ली पार्किंग तळ या दरम्यान एस.टी. बसेसची वाहतूक दोन्ही बाजूंनी सुरू राहील.
एकेरी वाहतूक मार्ग :
- घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व मोटार वाहने केर्ली मार्गे, तसेच दानेवाडी फाट्यावरून वाघबीळ किंवा गिरोली मार्गे कोल्हापूर व इतर ठिकाणी एकेरी मार्गाने जातील.
नो पार्किंग झोन :
- दानेवाडी फाटा क्रॉसिंग ते जुने आंब्याचे झाड, प्रवासी टोल नाक्याजवळील नवीन एस.टी. बस स्थानक रोड, जुने एस.टी. स्टँड रोड, सेंट्रल प्लाझा समोरील रोड, पी.डब्ल्यू.डी. रेस्ट हाऊस समोरील रोड, यमाई मंदिर कॉर्नर ते गिरोली घाट ते गिरोली फाटा (श्रावणी हॉटेल) या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना पार्किंग करण्यास मनाई आहे (नो पार्किंग झोन).
पार्किंग व्यवस्था :
जोतिबा डोंगरावर भाविकांसाठी खालील ठिकाणी पार्किंगची सोय उपलब्ध आहे:

- दुचाकी: यमाई मंदिर पाठीमागील बाजू , MTDC परिसर.
- दुचाकी/चारचाकी: तळ्यावरील पार्किंग.
- चारचाकी: यमाई मंदिर डावी बाजू , यमाई मंदिर उजवी बाजू , यमाई मंदिर वळणावरील/यमाई शाळा परिसर , जुने एस टी स्टँड समोर वळणावर , पिराचा कडा (टोल नाक्यासमोरील पार्किंग) , नवीन एस टी स्टँड आतील बाजू , नवीन एस टी स्टँड पाठीमागील बाजू.
- अवजड/मोठी वाहने: मेन पार्किंग , ग्रामपंचायतीजवळ , सेंट्रल प्लाझा.
राखीव पार्किंग ठिकाणे (डोंगरावरील पार्किंग अपुरे पडल्यास) :
- केर्ली हायस्कुल मैदान
- हॉटेल बिलीयन स्टार शेवताई मळा
- श्रावणी हॉटेलच्या पाठीमागे पठारावर या ठिकाणी वाहने पार्किंग करून भाविकांनी स्वतःच्या खर्चाने एस.टी. बसेसने जोतिबा डोंगरावर जावे
पूरस्थितीतील वाहतूक बदल (अंशतः):
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्यास, वाहतूक मार्गात खालीलप्रमाणे बदल केले जातील:
- षष्ठी यात्रेसाठी जाणारी सर्व मोटार वाहने टोप फाटा, सादळे, मादळे, गिरोली गाव, गिरोली घाट मार्गे श्री क्षेत्र जोतिबा येथे जातील. इतर सर्व मार्ग मोटार वाहनांसाठी बंद करण्यात येतील.
- घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व मोटार वाहने दानेवाडी फाट्यावरून वाघबीळ, दानेवाडी-माले-कोडोली-वारणा-वाठार मार्गे कोल्हापूर व इतर ठिकाणी एकेरी मार्गाने जातील.
- जोतिबा डोंगर ते जुने आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतूक दोन्ही मार्गाने चालू राहील.
- वाघबीळ व शाहूवाडीकडून दानेवाडी मार्गे येणारी सर्व वाहने बोरपाडळे-कोडोली-गिरोली मार्गे जोतिबा डोंगरावर जातील.
- रत्नागिरी ते कोल्हापूर मार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनांनी बोरपाडळे फाटा-कोडोली-वाठार-राष्ट्रीय महामार्ग या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
महत्त्वाची टीप: परिस्थितीनुसार आणि आवश्यकतेनुसार वरील प्रवेश मार्ग बंद करणे, सुरू करणे, नो पार्किंग झोन आणि पार्किंग ठिकाणे यामध्ये बदल केले जातील. हे वाहतूक नियमन ३० जुलै रोजी ००:०१ वाजल्यापासून ३१ जुलै रोजी यात्रा संपेपर्यंत लागू राहील.
पावसाळा सुरू असल्याने, जास्त पाऊस झाल्यास घाटावरील मार्ग धोकादायक आणि निसरडा होऊ शकतो. वाहनचालकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच, पावसामुळे डोंगरावरील पार्किंग ठिकाणी चिखल होण्याची शक्यता असल्याने, चांगले टायर असलेले वाहन या काळात वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.