व्हन्नूर येथे पाणी संस्था कर्जमुक्ती सोहळा, गुणवंतांचा सत्कार व शेतकरी मेळावा
सिद्धनेर्ली – सन 2020 साली घोषणा करूनही आत्ता प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनात्मक अनुदान देणार असलेचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.त्याअनुषंगाने शासनाने सेवा संस्था व बँकाकडून तीन वर्ष प्रामाणिक पणे कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांची माहिती मागवलेली आहे.तीन वर्षांची माहिती मागणी केलेमुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्याकेजची वाट बघून शेतकऱ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. जाचक अटी लावून प्रामाणिक शेतकर्यांना या अनुदानापासून वंचित राखाल तर याद राखा. असा इशारा शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी राज्य सरकारला दिला.
व्हन्नूर ता. कागल येथे शिवाजी पाणीपुरवठा संस्था कर्जमुक्ती सोहळा,विविध सेवा संस्थांच्या नवनिर्वाचित संचालकांसह मान्यवरांचा सत्कार व शेतकरी मेळावा अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
घाटगे पुढे म्हणाले, सलग तीन वर्षे पिक कर्ज घेऊन मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचा मंत्री हसन मुश्रीफ व महाविकास आघाडी सरकारने कुटील डाव आखला आहे. तीन वर्षाच्या अटीमुळे मोठ्या संख्येने शेतकरी या प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार आहेत. मुश्रीफसाहेब तुमच्यात धाडस असेल,वाघाचं काळीज व मर्दानगी असेल आणि स्वतःला जर शेतकऱ्याचा मुलगा म्हणत असाल तर ही तीन वर्षाची जाचक अट लावणार नाही. असे जाहीर करा.
खरेतर सरकारने हे अनुदान अडीच वर्षापूर्वीच दिले द्यावयास हवे होते. पण त्यानी हेतुपुरस्सर ते दिले नाही. कारण त्यावेळी कोणत्याही निवडणुका समोर नव्हत्या. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनुदान देण्याचे लांबवले आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर हे अनुदान शेतकऱ्यांना देऊन हे आम्ही केले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्याल. तर जनता ते चालू देणार नाही असा टोलाही श्री.घाटगे यांनी यावेळी सत्ताधा-यांना लगावला.
यावेळी शाहूचे संचालक युवराज पाटील, शिवाजी निकम,आनंदा बल्लाळ, भाऊसो खाडे,मारुती कोकणे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, शंकर लोंढे,कृष्णात शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागत संभाजी संकपाळ यांनी केले. आभार संदीप लोंढे यांनी मानले.
एकच घोषणा तीनवेळा
प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा राज्य सरकारने 2020 साली केली. हीच घोषणा आज अखेर तीन वेळा केली. कागलच्या मंत्र्यांनी तर हे अनुदान दिल्याच्या अविर्भावात शेतकऱ्यांकडून अभिनंदन करून घेतले. तसेच सोसायटींच्याकडून गावोगावी अभिनंदनचे डिजिटल बोर्ड लावून स्वतःची आरती ओवाळून घेतली, आता वेळकाढूपणा न करता अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा.असे प्रतिपादन श्री. घाटगे यांनी केले.