मुरगूड ( शशी दरेकर) : येथील हुतात्मा तुकाराम वाचनालयच्या वतीने महाराष्ट्र रेखाकला (एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट ) परीक्षा एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचा परिसरातील १२ माध्यमिक विद्यालयांच्या शाळांच्या सुमारे अडीचशे हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यशाळेत चित्रकला विषयाचे अनुभवी तज्ञ कलाशिक्षक संदीप मुसळे (स्थिऱ चित्र), महेश सुर्यवंशी (अक्षरलेखन), संभाजी भोसले (संकल्प चित्र व भूमिती), मोहन रणवरे(स्मरण चित्र) यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन हुतात्मा तुकाराम वाचनालयाचे सचिव शिवाजीराव चौगुले यांच्या हस्ते झाले. एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेचे सर्टिफिकेट इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेस वाढीव गुणासाठी ग्राह्य धरले जाते. त्यामुळे अलीकडील काही वर्षांमध्ये पालक वर्ग या परीक्षेस आपल्या पाल्याला प्रविष्ट करण्यास अग्रेसर राहतात. त्यामुळे या परीक्षेत विद्यार्थी संख्या वाढली आहे.

प्रत्यक्ष परीक्षेसाठीचे मार्गदर्शन शिबिर आयोजनाचे गेली २४ हुतात्मा तुकाराम वाचनालयाने सातत्य ठेवले आहे. यावेळी जय शिवराय एज्युकेशन संस्थेचे कार्यवाह अण्णासाहेब थोरवत, माजी उपनगराध्यक्ष जयसिंगराव भोसले, माजी नगरसेवक किरण गवाणकर, मारुती कांबळे, दत्ता मंडलिक, सहाय्यक ग्रंथपाल सौ. रेखा भारमल, इतर मान्यवर उपस्थित होते. आभार ग्रंथपाल संदीप वरपे यांनी मानले. तर कलाशिक्षक संदीप मुसळे, संभाजी भोसले शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.