
गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव एमआयडीसी मधील w -34 हनुमान इंजिनिअरिंग कंपनीमध्ये सीएनसी प्रोग्रामर म्हणून काम करणाऱ्या सागर पंडित पाटील यांच्यावर 25 लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कंपनीने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सागर पाटील राहणार लाटवडे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांनी जुलै 2022 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत कंपनीतील स्क्रॅप विक्रीतून मिळालेली रक्कम कंपनीच्या व्यवस्थापनाकडे जमा केली नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सागर पाटील यांच्याकडे कंपनीतील स्क्रॅप विक्रीची जबाबदारी होती. त्यांनी विक्रीतून मिळालेली रक्कम कंपनीचे व्यवस्थापक नितीन जाधव किंवा अकाउंटंट संदीप कोगले यांच्याकडे जमा करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी वारंवार मागणी करूनही रक्कम जमा केली नाही. 29 ऑक्टोबर 2024 रोजी व्यवस्थापक नितीन जाधव, अकाउंटंट संदीप कोगले आणि इतर कर्मचाऱ्यांसमोर सागर पाटील यांनी रक्कम जमा करण्याचे मान्य केले होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी रक्कम जमा केली नाही.
याशिवाय, सागर पाटील यांनी कंपनीतील सीएनसी आणि व्हीएमसी मशीनसाठी लागणारे इन्सर्ट (टूल्स) देखील परस्पर घेतल्याचा आरोप आहे. कंपनीच्या गेटवर वॉचमन नसल्याचा फायदा घेऊन त्यांनी हे कृत्य केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. व्यवस्थापनाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी 9 नोव्हेंबर 2024 पासून फोन बंद ठेवला आहे.
सागर पाटील यांनी कंपनीने कामावरून काढल्याचा दावा करत कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र, कंपनीने त्यांना कामावरून काढल्याचे नाकारले आहे. स्क्रॅप मालाची रक्कम परत द्यावी लागू नये, यासाठी ते कामावर येत नसल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
कंपनीने यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे . आरोपी सागर पाटील यांना अटक झालेले असून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीन नामंजूर केला व पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.