कोल्हापूर : शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व त्याचा लाभ राधानगरी तालुक्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात होण्यासाठी रामकृष्ण मंगल कार्यालय, सरवडे, ता. राधानगरी येथे गुरुवार, दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ‘उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम’ आयोजित केला आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमात उपस्थित रहावे व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
या कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्या विभागाचे माहिती पत्रक, सर्व योजनेचे कर्ज मागणी अर्ज, ऑनलाईन योजनेसाठी संबंधित तपशील व संपूर्ण माहिती घेऊन या सर्व योजनांचा लाभ घेतलेले यशस्वी उद्योजकांसह उपस्थित राहणार आहेत. जिल्हा अग्रणी बँक, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कृषी विभाग राज्य स्तर, नाबार्ड, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान विभाग, जिल्हा रेशीम कार्यालय, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सारथी संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळ आदी विभाग यात सहभागी होणार आहेत.
तालुक्यातील अर्जदारांनी जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, जन्म तारखेचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांची मूळ प्रत व एक झेरॉक्स प्रत घेऊन उपस्थित राहावे. त्या-त्या विभागाचे अधिकारी त्यांच्या विभागांच्या योजनाबद्दल सविस्तरपणे माहिती देतील. माहिती पत्रक व कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करून देतील तसेच आवश्यकतेनुसार त्याच ठिकाणी कर्ज प्रस्ताव दाखल करून घेतील किंवा उर्वरित कागदपत्राबद्दल मार्गदर्शन करतील. शासनाच्या अनेक कर्ज पुरवठा योजनांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.