माजी आमदार के. पी. पाटील यांचीही उपस्थिती
बैल पळविण्याची ५० वर्षांची परंपरा
बिद्री, दि. २२: बिद्री ता. कागल येथे कर्नाटकी बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या गावाला बैल पळविण्याची गेल्या ५० वर्षांची परंपरा आहे. पारंपारिक पद्धतीने साजरा केलेल्या या कर्नाटकी बेंदूर सणात पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार के. पी. पाटील यांनीही उपस्थिती लावली.
गावात तानाजी शांताराम पाटील यांच्याकडे असलेला बैल पळविण्याची ५० वर्षाहून अधिक जुनी परंपरा आहे. हा बैल उधळल्यानंतर जर आजूबाजूच्या गावात गेला तर त्या गावातील ग्रामस्थ बैलाच्या शेपटीच्या गोंड्यातील केस कापून आपल्याकडे ठेवतात. त्यानंतर ही परंपरा त्या गावाला लागू होते. ५० वर्षांपूर्वी कासारवाड्यातून आलेला बैल बिद्रीच्या शिवारात आल्यानंतर येथे ही परंपरा सुरू झाली.
जोडीदार जीवाभावाचा……!
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, बैल हा शेतकऱ्याचा जिवाभावाचा जोडीदार आहे. त्याच्या सोबतीनेच शेतकरी शेता-शिवारात रमतो. जरी तो प्राणी असला तरी शेतकऱ्याचा पोरा- बाळांएवढाच जीव बैलावर असतो. शेतकऱ्याच्या समृद्धीचा खऱ्या अर्थाने तो करता करविताच आहे.
गुलाल हमखास…..!
या पारंपारिक कर्नाटकी बेंदूर सणाच्या उत्सवामध्ये संपूर्ण गाव गुलालात न्हावून निघाला होता. उत्साही कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अंगावरही गुलालाची उधळण केली आणि या वेळेचा विधानसभेचा गुलालही आमचाच असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग हरी पाटील, सरपंच पांडुरंग चौगुले, पंचायत समितीचे माजी सभापती जयदीप पवार, उपसरपंच आनंदराव पाटील, बाजीराव गुरव, विश्वास पोवार, एम. बी. पाटील, राजाराम चौगुले, शिवाजी पाटील, विशाल चौगुले आदी प्रमुखांसह ग्रामस्थ उपस्थित होते.