महापूरग्रस्तांच्या निवारा केंद्रांना भेटीसह प्रशासनाला दिल्या सक्त सूचना
कोल्हापूर, दि. २८ : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह आंबेवाडी, इचलकरंजी, शिरोळ, नरसिंहवाडी व कुरुंदवाड येथील पूर परिस्थितीची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी महापूरग्रस्तांच्या निवारा केंद्रांना भेटी दिल्या. तसेच; महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा व निवारा केंद्रातील नागरिकांना जेवणासह वैद्यकीय सुविधाही तातडीने पुरवण्याच्या सक्त सूचना प्रशासनाला दिल्या.
सकाळी दहा वाजताच पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील महापूर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शिवाजी पुलाजवळच्या छत्रपती शाहू महाविद्यालयांमध्ये उभारलेल्या निवारक केंद्रात जाऊन महापूरग्रस्तांची आस्तेवाईकपणे चौकशी केली. तिथून पुढे आंबेवाडी येथे पोहोचत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी महापुराची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर इचलकरंजी शहरात पोहोचत नदी भागातील महापूर परिस्थितीची त्यांनी पाहणी केली. तसेच शहरातील श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे निवारा केंद्रामध्ये जाऊन महापूरग्रस्तांची चौकशी केली. त्यानंतर शिरोळ येथील तहसीलदार कार्यालयात त्यांनी शिरोळ तालुक्यातील पूर परिस्थितीची माहिती व वाढावा घेतला. शिरोळ – नरसिंहवाडी दरम्यानच्या पूर परिस्थितीचा आढावा घेऊन श्री. मुश्रीफ कुरुंदवाड येथे पोहोचले. कुरुंदवाड येथील पूर परिस्थितीच्या पाहणीबरोबरच त्यांनी निवारा केंद्रालाही भेट दिली.
महापूरग्रस्तांच्या जेवणासह आरोग्याच्या आणि इतर सर्वच सोयीसुविधा तातडीने द्या
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महापूरग्रस्तांना मदत व पुनर्वसन विभागाच्यावतीने नुकसान भरपाई देण्यासाठी पूर्ण शासन व प्रशासन कामाला लागले आहे. पाणी वाढण्याचे आजपासून कमी होईल, पाऊस आज कमी आहे. धरणक्षेत्रातही पाऊस कमी आहे. पिकांचे नुकसान जास्त झालेले आहे. विशेषता; भुईमूग आणि सोयाबीन इतर पिकांना काही फटका बसेल अस मला वाटत नाही. पाणी जास्त दिवस थांबले तर पिकांना मोठा फटका बसू शकतो. एन. डी. आर. एफ म. ची एक तुकडी आलेली आहे आणि दुसरीही तुकडी काल येणार होती ती आलेली असेल. अशा दोन टीम आलेल्या आहेत. स्थलांतरासाठी राहिलेली कुटुंबे पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत आहेत.
लहान बाळांच्या दुधासह पशुधनाचीही काळजी काटेकोर घ्या
इचलकरंजी येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, धरण क्षेत्रातल्या पावसाचा जोर कमी झाला आहे, त्यामुळे महापुराचे संकट लवकर दूर होईल. आतापर्यंत जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबे स्थलांतरित केलेली आहेत. त्यामध्ये जवळजवळ ५०४ लोक आपल्या इचलकरंजी शहरातील स्थलांतरित केलेले आहेत. आम्ही निवारा केंद्राची पाहणी केली. त्यांना राहण्याची जेवणाची सोय त्याठिकाणी केलेली आहे. तसेच; ६० जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्थाही केली आहे. आरोग्याची तपासणी, लहान मुलांना दूध अशी सगळी व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेले आहे. अलमट्टी धरणाच्या विषयावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व बेळगावचे जिल्हाधिकारी संपर्कात आहेत. आमचा एक जलसंपदा विभागातील उप अभियंताही तिथे नेमलेला आहे. तीन लाखापेक्षा जास्त क्युसेक अलमट्टी धरणातून विसर्ग चालू आहे. अडीच लाखाहून अधिक क्युसेकने हिप्परगी धरणातून विसर्ग चालू आहे.
यावेळी कोल्हापुरात जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेच्या आयुक्त श्रीमती के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी प्रसाद संकपाळ आदींसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच; इचलकरंजीमध्ये खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाशराव आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, राहुल आवाडे, पैलवान अमृतमामा भोसले, विठ्ठल चोपडे, प्रकाश पाटील- टाकवडेकर, शिरोळमध्ये नगराध्यक्ष अमरसिंह माने -पाटील आदी प्रमुखांसह अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहरासह आंबेवाडी, इचलकरंजी, शिरोळ, कुरुंदवाड येथे महापूर परिस्थितीची पाहणी केली व निवाराकेंद्रांना भेटी दिल्या.
Hey people!!!!!
Good mood and good luck to everyone!!!!!