महिलांच्या आयुष्यात गर्भधारणा व प्रसुती या अत्यंत महत्वाच्या, नाजुक व संवेदनशील घटना आहेत. गर्भधारणेच्या कालावधीमध्ये महिलांच्या शरीरात अनेक बदल घडतात. याच बरोबर प्रसुतीवेळी बाळाचा जन्म होतो तर महिलेचा पूर्नजन्म होतो, असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. गरोदरपणात महिलांना मोठ्या प्रमाणात शारिरीक व मानसिक ताणतणावास सामोरे जावे लागते. यामुळे ब-याच महिलांना गर्भधारणेवेळी व गरोदरपणात अनेक आजार, व्याधींचा सामना करावा लागतो. यामुळे त्या अतिजोखमीच्या माता होण्याची शक्यता असते. यामुळे माता मृत्यू होण्याचीही भीती असते. यासाठी सर्व गरोदर मातांची तपासणी करुन अतिजोखमीच्या माता होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी लवकर निदान करुन त्यांना आवश्यक उपाययोजना, औषधोपचार दिल्यास पुढील गुंतागुंत टाळता येते.

Advertisements

यापैकीच एक आजार म्हणजे गरोदरपणामुळे उद्भवणारा मधूमेह, सर्वसाधारणपणे गरोदरपणामध्ये ५ टक्के मातांना गरोदरपणामुळे उद्भवणारा मधूमेह होऊ शकतो. तसेच गर्भधारणेपूर्वी काही महिलांना मधूमेह असू शकतो. यासाठी सर्व गरोदर मातांची मधूमेहासाठी तपासणी योग्य वेळी केल्यास पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते. यासाठीच सार्वजनिक विभागामार्फत सर्व गरोदर मातांची OGTT (ओरल ग्लूकोज टॉलरन्स टेस्ट) ही तपासणी केली जाते. ही तपासणी गरोदरपणाच्या २४ ते २८ आठवड्यात करण्यात येते. यामध्ये ७५ ग्रॅम ग्लुकोज पावडर पाण्यात मिसळून पिण्यास दिले जाते व दोन तासांनी रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले जाते. ही तपासणी साधारणतः सकाळी उपाशीपोटी केल्यास (किमान आठ तास काही न खाता ) निदान चांगल्या प्रकारे होऊ शकते. या चाचणीमध्ये दोन तासांनी रक्तातील साखरेचे प्रमाण १४० mg/dl पेक्षा कमी असणे अपेक्षित असते. १४० ते १९९ mg/dl असल्यास मधूमेह होण्याची शक्यता जास्त असते. (prediabetic ) २०० mg/dl किंवा अधिक प्रमाण असल्यास मधूमेह असल्याचे निष्पन्न होते.

Advertisements

गरोदरपणामध्ये मधूमेह असल्यास खालील लक्षणे दिसून येतात.

लघवीमध्ये साखर आढळणे, सारखी तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा जानवणे, उलटी आल्यासारखे होणे (मळमळणे), दृष्टीस अस्पष्ट दिसणे, वारंवार जंतू संसर्ग होणे इत्यादी यासह जास्त वजन असणा-या (लठ्ठपणा) महिलांमध्ये मधूमेह होण्याचे प्रमाण अधिक असते.

Advertisements

गरोदरपणात उद्भवणा-या मधूमेहामुळे प्रसूतीच्यावेळी गुंतागुंत होऊ शकते तसेच वेळीच उपचार न घेतल्यास पुढील आयुष्यात ५० टक्के महिलांना मधूमेहाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच जन्मास येणा-या नवजात बालकामध्ये अनेक गुंतागुंत होऊ शकते जसे अधिक वजन असलेले बालक जन्मास येऊ शकते. ज्यामुळे सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागते, कमी दिवसाचे बालक जन्मास येऊ शकते, नवजात बालकास श्वास घेण्यास अडचणी येऊ शकतात, बालकाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असू शकते, नवजात बालकास पुढील आयुष्यात मधूमेहाची लागण होण्याचा धोका वाढतो, प्रसूतीच्यावेळी बालक दगाऊ शकते यासह गरोदरपणात मधूमेह नियंत्रणात न ठेवल्यास नवजात बालकामध्ये गंभीर स्वरुपाचे जन्मजात व्यंग होऊ शकतात. (मेंदू, मणका, हृदय या अवयवांशी संबंधित व्यंग)

गर्भधारणेमुळे उद्भवलेल्या मधुमेही महिलांमध्ये खालील गोष्टी आढळतात-

लठ्ठपणा जास्त असणे, शारिरीक व्यायामाची कमतरता, पूर्वीच्या गर्भधारणेवेळी मधूमेह असणे, जवळच्या (रक्तातील ) नातेवाईकास मधूमेह असणे, पूर्वीच्या खेपेस जास्त वजनाचे बालक जन्मास आले असणे, रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असणे ( prediabetic) वरील बाबी असणा-या महिलांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे गर्भधारणेच्या वेळी मधूमेह टाळता येईल किंवा नियंत्रीत ठेवता येईल जेणेकरुन गुंतागुंत टाळता येईल. गर्भधारणेपूर्वी व गर्भधारणेनंतर आवश्यक तपासण्या करुन घेणे व डॉक्टरांच्या सल्याने गरज असल्यास औषधोपचार घेणे.

नियंत्रीत आहार घेणे

यामध्ये गरोदरपणात थोड्या प्रमाणात तीन वेळा आहार घेणे ज्यामध्ये स्टार्चचे सेवन नियंत्रीत ठेवणे, तंतुमय पदार्थांचे (Fibre) पुरेशा प्रमाणात सेवन करणे, मोसमी फळांचे सेवन करणे, फळांचा रस व जास्त साखरेचे प्रमाण असलेले पेय यांचे सेवन टाळणे, गोड पदार्थाचे सेवन नियंत्रीत ठेवणे, बाजारातील पॅकबंद व तेलकट पदार्थांचे सेवन कमी करणे, हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या यांचे पुरेशा प्रमाणात सेवन करणे, नियमित व्यायाम करणे (किमान ३० मिनिटं चालणे ) वजन नियंत्रीत ठेवणे व जास्त वजन असल्यास कमी करणे इत्यादी. याबरोबरच नियमित आरोग्य तपासणी करुन घेणे व वैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यक औषधोपचार घेतल्यास गर्भावस्थेतील मधूमेह टाळता येऊ शकतो किंवा किमान नियंत्रीत ठेवता येतो व पुढील गुंतागुंत टाळता येते.

प्राचार्य,

आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र,

कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
India’s Hottest Picks: Top 10 Trending Stocks of 2025! जागतिक वन दिन 2025 Book HSRP Plate Process Step by Step kagal vidhansabha voting 2024 Stuart Broad