सिद्धीनेर्ली (लक्ष्मण पाटील) : श्री सिध्देश्वर दुध संस्थेच्या वतीने दुध उत्पादकांचा मोफत अपघाती वीमा उतरण्याचा व दसरा भेट देऊन प्रतिवर्षाप्रमाणे उच्चांकी बोनस व डिव्हीडंड देण्याचा निर्णय आॕनलाईन झालेल्या संस्थेच्या 49 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या चेअरमन सौ. सुवर्णा मधुकर आगळे होत्या.
संस्थेला दूध पुरवठा करुन शेअर्स रक्कम पूर्ण करणाऱ्या सर्वांना गट तट न पाहता सभासदत्व दिल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करण्यात आले. तसेच कोरोना काळात कर्मचाऱ्यांचाही संस्थेमार्फत मोफत विमा उतरल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करण्यात आले. संस्थेच्या सर्व दुध उत्पादकांचा संस्थेमार्फत मोफत अफगाती विमा उतरवण्यात येणार आहे. तसेच उत्पादकांना दसरा निमित्त भेटवस्तू देण्याचा निर्णय घेण्यात आला. थकबाकी व दुध पुरवठा न करणाऱ्या सभासदांना अक्रियाशील सभासदांमध्ये नोंदवण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे उत्पादकांना दिवाळीनिमित्त उच्चांकी बोनस व डिव्हीडंड देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी संस्थेला सर्वात जास्त दुध पुरवठा करणाऱ्या व सर्वात जास्त फॕट असणाऱ्या उत्पादकांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत दत्तात्रय घराळ, संदिप पाटील, दादोबा गोनुगडे, भानुदास मेटील, दत्तात्रय विष्णू पाटील, सागर पाटील, साताप्पा मगदूम, महादेव ठाणेकर, विशाल मगदूम यांनी सहभाग घेतला.
अहवाल वाचन सचिव चंदर मगदूम यांनी केले. स्वागत संदिप गुरव यांनी केले. विलास पोवार यांनी प्रास्ताविक करुन सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन शिवाजी बी. मगदूम, संचालक सुभाष पाटील, तानाजी पाटील, राघू हजारें,आंबुबाई गोनुगडे,अरविंद पाटील, विलास गोनुगडे हे उपस्थित होते.
आभार अशोक येवलुजे यांनी मानले.