कोल्हापूर (जिमाका): ॲग्रीस्टॅक प्रकल्प यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीचे काम वेळेत व अचूक करा. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील कामे महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने समन्वयातून पूर्ण करावीत, अशा सूचना प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिल्या.
ॲग्रीस्टॅक प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येणाऱ्या नियोजनाबाबत तहसीलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत प्रभारी जिल्हाधिकारी श्री.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.संपत खिलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आदी उपस्थित होते.
प्रभारी जिल्हाधिकारी श्री. शिंदे म्हणाले, जिल्ह्यात आजवर विविध विभागांच्या योजना यशस्वीपणे राबवण्यात आल्या असून या योजनांच्या अंमलबजावणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. महसूल, ग्रामविकास व कृषी विभागाने योग्य समन्वयातून ॲग्रीस्टॅक प्रकल्प देखील यशस्वीपणे राबवावा. पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या माहितीच्या नोंदणीचे काम अचूक होण्यासाठी गावनिहाय शिबिरांचे आयोजन करा. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार असल्याने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून हे मिशन मोडवर करा. मास्टर ट्रेनिंग होईपर्यंत सर्व तलाठ्यांनी प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची माहिती जमा करुन ठेवावी, असेही त्यांनी सांगितले.
गावनिहाय शिबिरांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची माहिती संकलित करा, असे प्रकल्पाचे नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले.
महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी म्हणाले, माहितीसंच निर्मितीची प्रक्रिया महसूल, कृषी व ग्रामविकास विभागाच्या ग्रामस्तरीय कर्मचाऱ्यांकडून मोबाईल ॲप द्वारे करण्यात येणार आहे. यासाठी सर्वप्रथम तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या सहभागातून ग्रामस्तरीय समित्या स्थापन कराव्यात. तसेच तालुकास्तरीय मास्टर ट्रेनरची नियुक्ती तात्काळ करुन जिल्हा प्रशासनाला माहिती सादर करा, असे सांगून ते म्हणाले, केंद्र शासनाच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रीकल्चर अंतर्गत अॅग्रीस्टॅक प्रकल्प देशभरात राबिवण्यात येणार आहे. अॅग्रीस्टॅक संकल्पनेअंतर्गत तीन पायाभूत माहिती संच निर्माण करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच (फार्मर रजिस्ट्री), हंगामी पिकांचा माहिती संच (क्रॉप सोन रजिस्ट्री) व भूसंदर्भिकृत भूभाग असणारे गाव नकाशे यांचा माहितीसंच (जिओ रेफरन्सड लँड पार्सल कॅडेस्ट्रल मॅप) अशा तीन प्रकारचे माहिती संच तयार होणार असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येणाऱ्या कार्यवाही बाबत तहसीलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत माहिती दिली.