कोल्हापूर दि.२६ : शेतकरी उत्पादक कंपन्याच्या माध्यमातून शेतमाल वितरण व मुल्यसाखळी निर्मिती विषयाबाबत कृतीशील नियोजनाबरोबरच जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेती व अनुषंगिक क्षेत्रास माहिती तंत्रज्ञानाची जोड देवून सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावर विशेष भर द्यावा, असे प्रतिपादन राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्थेच्या महासंचालिका एस. भुवनेश्वरी यांनी केले.
कृषी विभागाच्या वनामती नागपूर या राज्यस्तरीय प्रशिक्षण संस्थेच्या महासंचालिका एस.भुवनेश्वरी यांनी प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती),कोल्हापूर येथे आज भेट दिली. रामेती मार्फत राबविण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रम व नाविण्यपूर्ण उपक्रम कौतुकास्पद असून राज्यासाठी पथदर्शी प्रकल्प तयार करावा, अशा सूचना करुन कोल्हापूर,सांगली व सातारा जिल्हयाच्या प्रशिक्षण व मनुष्यबळविकासाचा त्यांनी आढावा घेतला. पुढील प्रशिक्षणाची उपयुक्तता व कार्यक्षमता वाढविण्याच्या अनुषंगाने त्यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
प्राचार्य उमेश पाटील यांनी रामेतीच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे व नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी संस्थेचे सर्व आधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होणारे कृषि पर्यवेक्षक अशेाक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत शंकरराव माळी व हरिदास हावळे यांनी केले तर नामदेव परीट यांनी आभार मानले.