दहा लाख कर्ज मर्यादेची शून्य टक्के व्याजदराची योजना
कोल्हापूर, दि. २९: केडीसीसी बँकेमध्ये इतर मागासवर्ग महामंडळ योजनेचे कर्ज मंजुरीपत्र लाभार्थ्याला देण्यात आले. कागल येथील सागर शिवाजीराव गुरव यांना दूध व्यवसायासाठी पाच लाखाचे हे बिनव्याजी कर्जाचे मंजुरीपत्र देण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, केडीसीसी बँकेच्यावतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील बेरोजगार तरुणांना रोजगार, उद्योग-व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य सुरू आहे. बँकेने आतापर्यंत एक हजारावर बेरोजगार युवकांना कर्जपुरवठा केला आहे. त्याच धर्तीवर राज्य शासनाच्या हमीवर महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त व विकास महामंडळ योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. त्याचे मंजुरीपत्र देण्यात आले.
बारा -बलुतेदारीतील रोजगारासह उद्योग -व्यवसायाला मिळणार चालना
बँकेचे अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ म्हणाले समृद्ध ग्रामव्यवस्थेसाठी महात्मा गांधीजींनी खेड्याकडे चला हा मंत्र दिला होता. या योजनेमुळे गाव खेड्यातील बारा- बलुतेदारीतील उद्योग व्यवसाय व रोजगाराला निश्चितच चालना मिळेल.
यावेळी बँकेचे अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ, उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, प्रा.अर्जुन आबिटकर, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, आदी संचालक उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांनी केले.