मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते आणि प्रसिद्ध निर्माते धीरज कुमार (dheeraj kumar) यांचे आज (१५ जुलै २०२५) ७९ व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून न्यूमोनियाशी झुंज देत होते आणि मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
धीरज कुमार (dheeraj kumar) यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने या आठवड्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांनी दिली असून, त्यांनी या कठीण काळात गोपनीयता राखण्याची विनंती केली आहे.

धीरज कुमार यांनी १९६५ मध्ये आपल्या मनोरंजन कारकिर्दीला सुरुवात केली. राजेश खन्ना आणि सुभाष घई यांच्यासोबत त्यांनी एका टॅलेंट शोमध्ये अंतिम फेरी गाठली होती. १९७० ते १९८४ दरम्यान त्यांनी २१ हून अधिक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी ‘स्वामी’, ‘हीरा पन्ना’, ‘रातों का राजा’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘सरगम’, ‘क्रांती’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या.
अभिनयासोबतच त्यांनी ‘क्रिएटिव्ह आय’ नावाच्या निर्मिती संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ‘ओम नमः शिवाय’, ‘श्री गणेश’, ‘जय संतोषी माँ’, ‘जप तप व्रत’, ‘अदालत’, ‘मिली’, ‘घर की लक्ष्मी बेटियां’ यांसारख्या अनेक लोकप्रिय पौराणिक आणि कौटुंबिक मालिकांची निर्मिती केली. दूरचित्रवाणी क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान मानले जाते.
धीरज कुमार यांच्या निधनामुळे चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील एका अनुभवी आणि प्रतिभावान व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. त्यांच्या कार्याची आणि योगदानाची आठवण नेहमीच ठेवली जाईल. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.