आयपीएस बिरदेव डोणे यांचा पुढाकार
मुरगूड ( शशी दरेकर ) : “बुके नको, बुक द्या” या आयपीएस अधिकारी बिरदेव डोणे यांच्या अनोख्या आवाहनाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादातून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा उपक्रम उभा राहिला आहे. त्यांचे जन्मगाव यमगे ता.कागल येथे श्री विठ्ठल-बिरदेव अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात येत आहे.याचा लाभ थेट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणार आहे.या प्रेरणादायी कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हापोलीस प्रमुख योगेश कुमार उपस्थित राहणार आहे.
यमगे येथील बिरदेव डोणे यांनी युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील बिरदेव यांच्या या यशानंतर राज्यभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गावाने एकत्र येत त्यांची भव्य मिरवणूक काढली होती. या वेळी बिरदेव यांनी सत्काराला बुके नको बुक दया असे प्रेरणादायी आवाहन केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आवाहना ला प्रतिसाद देत राज्यभरातून अनेक लोकांनी, संस्थानी किंमती पुस्तके बिरदेव यांना भेट दिली होती.

जिल्हाधिकारी, जिल्हापोलीस प्रमुख राहणार उपस्थित
गावोगावी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची ओढ असली, तरी शहरात जावे लागते, खर्चिक कोचिंग क्लासेस घ्यावे लागतात, योग्य वातावरण मिळत नाही, या अडचणी विद्यार्थ्यांसमोर असतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी यमगे येथे बिरदेव डोणे यांच्या पुढाकारतून सदरचे केंद्र सुरु होत आहे.
उद्या मंगळवारी बिरदेव मंदिरच्या आवारात सकाळी दहा वाजता पार पडणाऱ्या या कार्यक्रमासाठी कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे व व्यावसायिक संचालक राजीव पाटील आदी प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.समस्त धनगर समाज, सुवर्णयुग तरुण मंडळ, शिवम परिवार,आझाद तरुण मंडळ तसेच गावातील सर्व तरुण मंडळे व ग्रामस्थांच्या सामूहिक पुढाकारातून हा उपक्रम प्रत्यक्षात आला असल्याचे बिरदेव डोणे यांनी सांगितले.