
कागल : राज्यातील महिलांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून मी कटीबद्ध आहे .असे प्रतिपादन नाम. हसनसो मुश्रीफ यांनी काढले.
ते दि कागल एज्युकेशन सोसायटी संचलित सरलादेवी यशवंतराव माने बाॅईज ॲण्ड गर्ल्स हायस्कूल, कागल मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त 9 ते 26 वर्षाखालील सर्व मुलींना
ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लसीकरण शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, विविध क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. या धावपळीच्या युगात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.पण यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाचे कॅन्सर असे जीवघेणे आजार होत असून याचे महागडे उपचार घेण्यासारखी आजची परिस्थिती नसल्याने कॅन्सर ला प्रतिबंध करण्यासाठी वय वर्ष 9 ते 26 मधील मुलींना नाम.हसनसो मुश्रीफ फाऊंडेशन कागल यांच्यामार्फत संपूर्ण जिल्ह्यात H P V लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून भविष्यातील पिढी या आजारापासून दूर होतील. महिला निरोगी व सुदृढ राहतील यासाठी प्रयत्न करत आहे. HPV या लसीकरणाबाबत कोणीही काळजी करू नये किंवा कोणतीही शंका बाळगण्याची गरज नाही. HPV लस ही पूर्णपणे सुरक्षीत असून सर्वांनी समाजातील सर्व अविवाहीत मुलींना आपण पालक म्हणून मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.
शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून वैद्यकीय साधने व सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण शासन दरबारी प्रयत्न करत असल्याचे सांगताना आपण नेहमी जनतेच्या सेवेसाठी तत्पर आहे. आपण या सर्व सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले .
यानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक चंदनवाले यांनी महिलांना होणाऱ्या ब्रेस्ट कॅन्सर व गर्भाशय कॅन्सर संबंधी माहिती देताना कॅन्सरची कारणे ,त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, त्याची विविध लक्षणे कोणती आहेत याबद्दल सविस्तर माहिती दिली . यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लसीकरण केलेल्या मुलींना नामदार हसनसो मुश्रीफ फाउंडेशन यांचेवतीने प्रमाणपत्र देण्यात आले .
या कार्यक्रमा प्रसंगी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे , गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे , दि कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव व के.डी.सी.सी. बँकेचे संचालक प्रताप उर्फभैय्यासाहेब माने, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे,माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, माजी उपनगराध्यक्ष प्रविण काळबर तसेच लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय पथक व महिला पालक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन शालेय समितीच्या अध्यक्षा सौ. सविता माने मॅडम यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. राजनंदा पाटील यांनी केले .आभार प्रविण काळबर यांनी मानले तर सूत्रसंचालन शंकर संकपाळ यांनी केले.