मुंबई : सहकार विभागातील गट-क संवर्गातील, कोकण विभागातील निम्नश्रेणी लघुलेखक या पदासाठी परीक्षा दिलेल्या उमदेवारांपैकी ज्या उमेदवाराना परीक्षेस किमान ४५ टक्के गुण प्राप्त आहेत, अशा उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर १० जानेवारी २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
व्यावसायिक चाचणी मराठी अथवा इंग्रजी भाषेतून घ्यावयाची आहे. मात्र, यादीतील उमेदवारांनी लघुलेखन व टंकलेखनाचे प्रमाणपत्र अर्ज सादर करताना ऑनलाईन सादर केलेले नसल्याने किती उमेदवार मराठी आणि किती उमेदवार इंग्रजी भाषेतील प्रमाणपत्र धारण करीत आहेत याचा तपशिल उपलब्ध होत नाही. व्यावसायिक चाचणी घेण्यासाठी संबंधित उमेदवार हे मराठी माध्यमातून परीक्षा देणार की इंग्रजी माध्यमातून परीक्षा देणार याबाबतची माहिती आवश्यक आहे.
संबंधित उमेदवारांनी ही माहिती व प्रमाणपत्र सादर करण्यासाठीची लिंक सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे कार्यालयाकडील https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ५ ते ११ फेब्रुवारी २०२४ (रात्री २३.५९ वा. पर्यंत) या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
या कालावधीत संबंधित माहिती उमेदवारांनी उक्त संकतेस्थळावर भरण्याबाबतची दक्षता घ्यावी, असे आवाहन कोकण विभागाचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.