ऍड. विपुल दुशिंग यांच्या सनदेच्या रद्दीकरणाची ‘बसप’ची मागणी

वैष्णवी हगवणे-कस्पटे प्रकरणात नवा ट्विस्ट

पुणे : राज्यभरात गाजत असलेल्या वैष्णवी हगवणे-कस्पटे मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक वळण आले आहे. बहुजन समाज पक्षाने (बसप) हगवणे कुटुंबीयांचे वकील विपुल दुशिंग यांच्या सनदेच्या तात्काळ रद्दीकरणाची मागणी बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे केली आहे. दुशिंग यांच्या असंवेदनशील आणि खालच्या स्तरातील युक्तिवादाने पीडितेचे आणि तिच्या कुटुंबियांचे चारित्र्यहनन होत असून, न्यायालयाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप बसपने केला आहे.

Advertisements

मंगळवारी (दि. ३) बसपचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ. हुलगेश चलवादी यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत पीडित कस्पटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाले. यावेळी बसप पीडित कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे आश्वासन डॉ. चलवादी यांनी दिले.

Advertisements

ऍड. दुशिंग यांच्या युक्तिवादावर गंभीर आक्षेप:

डॉ. चलवादी यांनी ऍड. दुशिंग यांच्या न्यायालयीन युक्तिवादावर तीव्र आक्षेप घेतला आहे. दुशिंग यांनी वैष्णवीविरोधात अत्यंत खालच्या स्तरातील युक्तिवाद केला असून, मृत पीडितेची अवहेलना करणे अत्यंत निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अशाप्रकारे वकिली पेशाला काळिमा फासणारी बाब असून, बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी याची दखल घेऊन दुशिंग यांची सनद तात्काळ रद्द करावी, अशी मागणी डॉ. चलवादी यांनी केली.

Advertisements

संविधानाचा आणि मानवी हक्कांचा अपमान:

डॉ. चलवादी यांनी म्हटले की, ऍड. दुशिंग यांचे वर्तन न्यायप्रक्रियेचा गैरवापर असून, त्यांचा युक्तिवाद केवळ पीडितेची अवहेलना करणारा नाही, तर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून स्त्रियांच्या प्रतिष्ठेच्या अधिकाराचा आणि मानवी हक्कांचा थेट अपमान आहे. वकिलांची भूमिका सामाजिक जाणीव आणि नीतिमत्तेने परिपूर्ण असावी, परंतु दुशिंग यांनी आपल्या वकिलीच्या कर्तव्यात सामाजिक जबाबदारीचे भान सोडल्याचे त्यांच्या वर्तनावरून स्पष्ट होत असल्याचे मत डॉ. चलवादी यांनी व्यक्त केले.

स्वस्त प्रसिद्धीसाठी निराधार आरोप?

डॉ. चलवादी यांनी दावा केला आहे की, ऍड. दुशिंग यांच्याकडून केवळ स्वस्त प्रसिद्धीसाठी कुठलेही पुरावे नसताना खालच्या स्तराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यांनी दुशिंग यांच्या मागील पार्श्वभूमीवरही प्रकाश टाकला. २०२२ मध्ये दुशिंग यांच्या विरोधात सरकारी वकिलाची कॉलर पकडून त्यांना मारहाण केल्याचा गुन्हा वडगाव मावळ पोलीस ठाण्यात दाखल आहे. सहकारी वकिलावरच हल्ला करण्याची दुशिंग यांची मानसिकता आणि पेशाबद्दलची असंवेदनशीलता यावरून दिसून येते, असे डॉ. चलवादी यांनी म्हटले आहे. अशा वकिलाला प्रॅक्टिस करण्यापासून रोखणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

या प्रकरणामुळे आता न्यायालयीन आणि कायदेशीर वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!