कागल (प्रतिनिधी): कागल शहरातील शिवनेरी पार्क परिसरातील एका घरात अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश करत तब्बल २१ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये १० लाख रुपयांची रोकड आणि ११ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रफीक गौस सय्यद (वय ५३, व्यवसाय- औषध विक्री) हे शिवनेरी पार्क, गल्ली नं. २ येथे राहतात. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० ते रात्री १०:०० च्या दरम्यान जेव्हा त्यांचे कुटुंब घरी नव्हते, तेव्हा अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरुममधील तिजोरीचे लॉकर उचकटून त्यातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लंपास केले.

चोरीला गेलेला मुद्देमाल:
रोख रक्कम: १०,००,००० रुपये (५०० रुपयांच्या नोटा)
सोन्याचे दागिने (एकूण ११० ग्रॅम):
३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस (३ लाख रु.)
३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार (३ लाख रु.)
१५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (१.५ लाख रु.)
२० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ४ अंगठ्या (२ लाख रु.)
१५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण (१.५ लाख रु.)
पोलिस तपास सुरू:
या प्रकरणी रफीक सय्यद यांनी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५[A] नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (करवीर विभाग) आणि पोलीस निरीक्षक घावटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव जमादार करत आहेत. भरवस्तीत झालेल्या या मोठ्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.