कागल : कागल शहराचा प्रारूप विकास आराखडा रद्द करावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय शेतकरी कृती समीतीच्या वतीने होळी सणाच्या दिवशी शहरातून घंटानाद करीत बोंब मारो आंदोलन करण्यात आले. सर्व देवदेवतांना गाऱ्हाणे घालण्यात आले.
आक्रमक झालेले हे सर्व आराखडाबाधित लोक थेट मुख्याधिकारी यांच्या कार्यालयातही घंटानाद करीत घुसल्याने एकच गोंधळ उडाला. दरम्यान, मुख्याधिकारी श्री राम पवार यांनी सर्वांना शांत करीत आपल्या हरकती शासनाला कळविल्या जात आहेत. सुनावणीलाही प्रत्येकाला बोलवू असे सांगितले.
येथील ग्रामदैवत गहिनीनाथ गैबी पीराचे दर्शन घेऊन ही घंटानाद आणि बोंब मारो फेरी सुरू करण्यात आली.शहरातील सर्व भागातून आणि सर्व देवतांना साकडे घालण्यात आले. नगरपालिका चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कृती समितीचे अनिल जाधव, सचिन मठुरे, बाळगॉड मगदुम, अमर सणगर, स्वप्निल हेगडे, सागर कोंडेकर, बाळासाहेब खाडे, सतीश पाटील, महेंद्र जकाते, महेश घाटगे, हिंदुराव पसारे, संभाजी घाटगे, बाबूराव स्वामी सहभागी झाले होते.