मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ग्रामीण रुग्णालयास खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नामूळे ५० बेडला राज्य शासनाकडून मंजूरी मिळाली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या कक्षेत २५ ते३० गावांतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णालयाचे विस्तारीकरण व्हावे अशी अनेक दिवसापासून मागणी होती. या संदर्भात रुग्णालयाचा ५० बेडचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता. खासदार संजय मंडलिक यांनी या प्रस्तावाचा पाठपुरावा करून हा प्रश्न धसास लावला होता. अखेर त्यास यश मिळाले.
मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढल्याने आता या रुग्णालयाला सात तज्ञ डॉक्टर मिळणार आहेत तसेच ९४ नवीन आरोग्य सेवक सेवेत येणार आहे या रुग्णालयास ३० बेडवरून ५० बेडचा दर्जा मिळण्यास शासन निर्णय झाल्याने नागरिकातून आनंद व समाधान व्यक्त होत आहे.
त्यासाठी मुख्यमंत्री ना .एकनाथ शिंदे, खासदार संजय मंडलिक यांच्यासह तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर वैद्यकिय शिक्षण मंत्री ना हसन मुश्रीफ, माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबीटकर यांचे सहकार्य मिळाल्याचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेद्वारे सांगितले यावेळी माजी नगरसेवक विशाल सुर्यवंशी, अमर सणगर, राजेंद्र भारमल, आकाश दरेकर, विजय मोरबाळे, राजेंद्र महाजन, सचिन मेंडके, अजित कापसे आदि उपस्थित होते.