विलासरावांनी जशी पी.एन. पाटलांना साथ दिली.. आता मी राहुल पाटलांच्या पाठीशी उभा राहीन – अजित पवार
कोल्हापूर, 25 ऑगस्ट 2025 : आज कोल्हापुरात राहुल पाटील, राजेश पाटील, शिवाजीराव पाटील, तेजस्विनी राहुल पाटील, बाळासाहेब खाडे, पीएच पाटील, भारत पाटील, शिवाजी करंडे, संदीप पाटील, शंकरराव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, माजी नगरसेवक व भोगावती साखर कारखान्याचे संचालक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे पश्चिम महाराष्ट्रात पक्षाला मोठी ताकद मिळाली असल्याचे अजित पवार म्हणाले.
दिवंगत पी.एन. पाटील यांना अभिवादन करताना दादा म्हणाले, “विलासराव देशमुख जसे पी.एन. पाटलांच्या पाठीशी उभे राहिले, तसेच मी राहुल पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. पाटलांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू.”

शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या कार्याची परंपरा आणि महाराणी ताराबाई यांच्या ३७५व्या जयंतीचे स्मरण करून त्यांनी म्हटले की, “राजकारणात यश-अपयश असते; पण धैर्य हरवू नये. जनतेचा विश्वास आणि मेहनतीमुळे नक्की यश मिळते.” यशवंतराव चव्हाणांचा दाखला देत त्यांनी ‘बेरीज बेरजेचे राजकारण’ हीच राष्ट्रवादीची वाटचाल असल्याचे सांगितले.

आपल्या कामकाजाबाबत बोलताना पवार म्हणाले, “मी सकाळी लवकर उठून कामाला लागतो. शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हे माझे ध्येय आहे. राहुल पाटलांनी कोणत्याही अटीशिवाय पक्षात प्रवेश केला, यातून त्यांची प्रामाणिकता दिसते. आम्ही दोघेही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांना कधीही अनावश्यक त्रास होऊ नये, हीच आमची बांधिलकी आहे.”
शेतकऱ्यांसाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना त्यांनी सांगितले, “३, ५ व ७.५ एचपीच्या पंपांचे वीजबिले माफ केली आहेत. याचा लाभ ४४ लाख शेतकऱ्यांना झाला असून २० हजार कोटी रुपये यासाठी खर्च केले जात आहेत. शिवाय सौर पंपांसाठी २४ हजार कोटींचा निधी दिला आहे. ऊस दर, इथेनॉल प्रकल्प, दूध उत्पादकांना आवश्यकतेनुसार प्रतिलिटर ५ ते ७ रुपयांची अनुदाने आणि भोगावती साखर कारखान्याची क्षमता ५ हजार टनांपर्यंत वाढविण्यासाठी संपूर्ण मदत केली जाईल.”
महिलांबाबत बोलताना त्यांनी ठाम भूमिका घेतली की, “शासन हे महिलांचे भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे. महिलांच्या कल्याणासाठी दरवर्षी ४५ हजार कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. महिला सन्मानाने, सुरक्षिततेने व निर्भयपणे जगल्या पाहिजेत.”
गृहनिर्माणाविषयी बोलताना पवार म्हणाले, “पंतप्रधान आवास योजनेतून जातीधर्माची अट न ठेवता प्रत्येक गरीबाला घर देण्यात येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील कुणीही बेघर राहणार नाही.” तसेच शेतकऱ्यांना आता ३ लाख रुपयांपर्यंत पीककर्ज शून्य टक्के व्याजदरावर दिले जात असून वार्षिक १२ हजार रुपयांची थेट मदत राज्य व केंद्र सरकारकडून मिळते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना संदेश देताना पवार म्हणाले, “जशी निष्ठा आणि मेहनत तुम्ही पी.एन. पाटलांसाठी दाखवली, तशीच शिस्तबद्धपणे राहुल पाटलांच्या यशासाठी दाखवा.”
“विकास, सामाजिक न्याय आणि पारदर्शक शासन यासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध आहे. गुणवत्तेवर तडजोड नाही. मी सदैव सत्य बोलणार, चुकल्यास ती मान्य करणार आणि शेतकरी, महिला व गोरगरिबांसाठी अखंड काम करत राहणार,” अशा शब्दांत अजित पवारांनी भाषणाचा समारोप केला.